आज वेतन जमा होण्याची शक्यता : संचालनालयाच्या संचालकांकडून नियुक्तीला मुभा
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 138 कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तसेच त्यांच्या नियुक्तीबाबत घोळ झाला होता. याप्रकरणी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी त्यांची नियुक्ती करण्यास मान्यता द्यावी, यासाठी बेंगळूर येथील नगर प्रशासन संचालनालयाच्या संचालकांकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून स्थानिक पातळीवर कामगारांची नियुक्ती करण्याचा अधिकार महापालिकेला असल्याचे संचालकांनी स्पष्ट केल्याने या 138 कामगारांचा प्रश्न निकालात लागला आहे. त्यामुळे मंगळवारी त्यांचे वेतन जमा होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वाहनांवर काही चालकांची तसेच सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती नियमानुसार झाली नाही, असे कारण पुढे करत त्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ सुरू होती. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे शहरातील कचऱ्याची उचल करण्याची समस्या गंभीर बनत चालली. आंदोलन मागे घ्यावे, अशी मागणी आयुक्त अशोक दुडगुंटी याचबरोबर आमदार राजू सेठ यांनी केली होती.
त्यांच्या विनंतीला मान देऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बेंगळूर येथील नगर प्रशासन संचालनालयाकडे पाठपुरावा केला. यासाठी साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांना बेंगळूरला पाठवून देण्यात आले होते. त्यांनी संचालकांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर संचालकांनी हिरवाकंदील दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या तरी निकालात लागले आहे. सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना तत्कालीन आयुक्त रुद्रेश घाळी यांनी आदेश दिल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तो आदेश नियमानुसार नसल्याचे कारण पुढे करत काहीजणांनी आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे 138 कामगारांचा प्रश्न गंभीर बनला होता. काही महिने या कर्मचाऱ्यांनी काम केले होते. त्यांना वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. महापालिकेसमोर दोनवेळा ठिय्या आंदोलन केले. याचबरोबर सदाशिवनगर येथील वाहन गोडाऊनसमोरही आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर महापालिका खडबडून जागी झाली. त्यानंतर नगर प्रशासनाकडे पाठपुरावा करून या नियुक्तीला मान्यता मिळविली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न सुटला असून लवकरच त्यांना वेतन दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.









