वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रिकेटच्या टी-20 या प्रकारामध्ये न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सुझी बेट्सने सर्वाधिक धावा करताना भारताच्या विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला. आता टी-20 प्रकारामध्ये सुझी बेट्स ही सर्वात अधिक धावा नोंदविणारी क्रिकेटपटू ठरली आहे.
न्यूझीलंडच्या बेट्सने 149 टी-20 सामन्यात 29.78 धावांच्या सरासरीने 4021 धावा जमविल्या असून त्यामध्ये एक शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. भारताच्या विराट कोहलीने टी-20 प्रकारामध्ये 115 सामन्यात 52.73 धावांच्या सरासरीने 4008 धावा जमविल्या असून त्यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. अलिकडेच दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात बेट्सने कोहलीचा विक्रम मागे टाकला. तिने या सामन्यात 1 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा जमविल्या. पण न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकला आला नाही. दक्षिण आफ्रिका महिला संघाने हा सामना 11 धावांनी जिंकला होता. महिलांच्या टी-20 प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक धावा जमविणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसरे स्थान मिळविताना 132 टी-20 सामन्यात 3405 धावा जमविल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.









