वन नेशन-वन आयडी’च्या धर्तीवर मुलांसाठी नवी ओळख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘वन नेशन-वन आयडी’प्रमाणे आता केंद्र सरकार शालेय मुलांसाठीही वन आयडी योजनेवर काम करत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय देशातील शाळकरी मुलांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. याला ‘ऑटोमेटेड परमनंट अॅपॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ (अपार किंवा एपीएएआर) असे संबोधले जाणार आहे. याअंतर्गत मिळणारा ओळखक्रमांक पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक भारतीय आयडी क्रमांक असेल. हा क्रमांक आधार आयडीशी लिंक केल्यानंतर त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा किंवा कामगिरीचा संपूर्ण लेखाजोखा समाविष्ट केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
वन नेशन-वन स्टुडंट आयडी योजनेअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांच्या युनिक आयडीसाठी आणि शाळा व्यवस्थापनांसाठी आधार कार्डद्वारे मुलांची नावे, पत्ते, जन्मतारीख आणि फोटोंसह अनेक माहिती गोळा करणार आहे. यासाठी प्रत्येक मुलाच्या पालकांचीही परवानगी नक्कीच घेतली जाईल. या माहितीच्या आधारे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी, क्रीडा उपक्रम, अभ्यासक्रमेतर प्रगती किंवा इतर शैक्षणिक कौशल्यांचा सर्व डेटा एकत्र येईल आणि सहज उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.
या ऑटोमेटेड परमनंट अॅपॅडमिक अकाउंट रजिस्ट्री किंवा अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज, पुरस्कार आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल. नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत केंद्र सरकार या विद्यार्थी आयडीच्या पुढाकारावर काम करत असून ते फक्त शैक्षणिक वापरासाठी वापरले जाणार असल्याचे समजते. देशात एकसमान शैक्षणिक परिसंस्था आणण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे. याद्वारे सरकार कोणासाठीही आजीवन आयडी क्रमांक तयार करू शकेल आणि तो आधार क्रमांकाशीही जोडला जाणार आहे.









