वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील सत्तारुढ आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होत चालला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सराकर 2015 पासून मला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. लोकांवर अनेक प्रकारचे दबाव टाकून माझ्याविरोधात साक्ष देण्यास सांगितले जात आहे. अनेक लोकांना यातना देखील देण्यात आल्या. पंतप्रधानांनी देशासाठी काम करण्याऐवजी 24 तास विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी षड्यंत्र रचत राहतात असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आप खासदार राघव चड्ढा यांनी अग्निवीर प्रकरणी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पंजाबच्या वीरभूमीवर जन्मलेल्या अमृतपालचा जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सीमारेषेवर मृत्यू झाल्यावर त्याला हुतात्म्याचा दर्जा न मिळाल्याने चड्ढा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमृतपालने देशाची सेवा करताना बलिदान केले, परंतु त्याचे पार्थिव मूळगावी आणले गेल्यावर अग्निवीर योजनेचे सत्य समोर आल्याचा दावा चड्ढा यांनी केला आहे. तर सैन्याने याप्रकरणी भूमिका स्पष्ट करत आरोप फेटाळून लावले आहेत.
आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे नेते सध्या नोंद गुन्ह्यांमध्ये अडचणीत आले आहेत. या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाला मिळालेली लोकप्रियता आणि विस्तारामुळे भाजप घाबरून गेल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.









