10 हजार जणांची होणार भरती : तिमाहीत मिळणार वेतनवाढ
वृत्तसंस्था/ बेंगळूर
एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या आयटी क्षेत्रातील कंपनीकडून आगामी काळामध्ये नव्याने उमेदवारांची भरती करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे कंपनी लवकरच उमेदवारांच्या वेतनातही वाढ करणार आहे, असे समजते.
किती होणार भरती
येणाऱ्या तिमाहीत उमेदवारांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. जवळपास 90 टक्के कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचेही एचसीएल टेक्नॉलॉजीज यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नोएडा या ठिकाणी मुख्य कार्यालय असणाऱ्या कंपनीने आगामी काळामध्ये नव्या उमेदवारांची भरती कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून करणार असल्याचे म्हटले असून या अंतर्गत 10 हजार नव्या उमेदवारांना यावर्षी घेण्यात येणार आहे. यायोगे एकंदर नव्या उमेदवारांची संख्या यावर्षी 27 हजारपर्यंत पोहोचणार आहे.
काय म्हणाले सीईओ
पहिल्या निम्म्या वर्षांमध्ये कंपनीचा विकास अपेक्षित असा झाला नसल्याचे कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सी विजयकुमार यांनी म्हटले आहे. आगामी तिमाहीमध्ये कंपनीला विकास साधण्याची अत्यंत गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.









