कोल्हापूर प्रतिनिधी
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सोलापूर दौऱ्यावर असताना शाई फेकण्याची घटना घडली. छावा संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. चंद्रकांतदादांबाबत शाईफेकीचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. चंद्रकांतदादा मराठा आमदार आहेत. कोल्हापूरचा स्वाभिमान आहेत, ही बाब आंदोलकांनी विसरू नये. यापुढे जर अशी घटना घडली तर ती सहन केली जाणार नाही. राज्य घटनेने दिलेल्या अधिकारनुसार सर्वांना अधिकार स्वातंत्र आहे. पण या स्वातंत्र्याचा कुणी यापुढे गैरवापर केला आणि चंद्रकांतदादांच्या बाबतीत पुन्हा अशी घटना घडली तर त्या आंदोलकांची गाठ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांशी असेल, असा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी दिला आहे. त्याचबरोबर छावा संघटना सामाजिक कार्य करणारी असून कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे निषेध
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सोलापूर येथील दौऱ्यावेळी झालेल्या शाईफेक प्रकरणी आरोपींची सर्वकष चौकशी करून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक देसाई व राजेंद्र सुर्यवंशी यांनी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात देसाई, सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की : मुळातच चंद्रकांतदादांवर अशाप्रकारचा हा भ्याड शाई हल्ला दुसऱ्यांदा झाला आहे. अशा घटनेतील आरोपीस चंद्रकांतदादांकडून वारंवार क्षमा केली जात असल्याने भ्याडकृत्य करणारे लोक शाईफेकीचे घटना घडवत आहेत. त्यामुळे गृहमंत्री असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा गुन्हेगारांना जबर शासन करावे आणि पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, यासाठी चंद्रकांतदादांनी सुद्धा क्षमाशील राहू नये. तसेच या घटनेमागील सूत्रधार शोधून जातीय तेढ निर्माण करून समाजा-समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहनही या निवेदनात देसाई आणि सूर्यवंशी यांनी केले आहे.