हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा काढल्यास आमरण उपोषण
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरा लगतच्या गावांसाठी सरकारने कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणची निर्मिती केली आहे. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीचा विषय संपला आहे. त्यामुळे पुन्हा हा विषय उकऊन काढून संभ्रम पसरवू नये, अशी मागणी करत हद्दवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षिय हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये प्रस्तावित हद्दवाढीच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाल्यास सर्व गावांतर्फे आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या मार्गदर्शखाली व समितीचे अध्यक्ष भगवान काटे, निमंत्रक राजू माने, उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सचिव बी. ए. पाटील, प्रवक्ते नारायण पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर हे उपोषण करण्यात आले. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत झालेल्या या आंदोलनात हद्दवाढीविरोधी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हद्दवाढीला विरोध नोंदविला. दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हा अधिकारी राहूल रेखावार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने हद्दवाढ समर्थक व विरोधी समितींशी चर्चा कऊन कोल्हापूर नागरि विकास क्षेत्र प्राधिकरणची स्थापना 16 ऑगस्ट 2017 मध्ये नगररचना कायदा कलम 42 प्रमाणे करण्यात आली. त्यामुळे हद्दवाढ हा विषय संपला आहे. कोल्हापूर शहराचे महसूल क्षेत्र व संपूर्ण जिह्याच्या महसूल क्षेत्राचा व लोकसंख्येचा आधार घेऊन प्राधिकरणाच्या परिपत्रकाप्रमाणे बदल करण्यात यावा. कारण सध्या असलेली जिह्यातील बेरोजगारी संपुष्टात यायच असल्यास उद्योग निर्मिती आवश्यक आहे. इचलकरंजी महापालिका व कोल्हापूर महापालिका, तसेच जिह्यात नगर परिषद व नगरपंचायतींची संख्या जास्त आहे. या सर्वांचा विचार केल्यास उद्योग, शेती, पर्यटन विकासाच्यादृष्टीने कोल्हापूर जिलहा् समृध्द बनवायचा असेल तर प्राधिकरणाद्वारेच विकास होणे गरजेचे आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण जिह्याचा विकास होऊ शकतो. प्राधिकरणाच्या निर्मितीनंतर हद्दवाढ हा विषय संपला आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा पुन्हा उकऊन काढून जनतेमध्ये संभ्रम पसरविला जात असून तो तात्काळ थांबविला पाहीजे.
आंदोलनात महेश चव्हाण, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळोखे, तानाजी पालकर, संग्राम जाधव, विश्वजीत बगाडे, पृथ्वीराज पाटील, दिलीप पुजारी, प्रकाश सुर्यवंशी, बाळासाहेब साळोखे, कावजी कदम, रवींद्र चौगुले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.