बॅडमिंटन खेळाने स्पर्धेला 19 पासून : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर लढती,दोन्ही विभागात 6 संघांचा असेल सहभाग
मडगांव : उद्या मंगळवार 17 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांत भाग घेण्यासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून खेळाडू गोव्यात दाखल होण्यास सुरूवात होणार आहे. गोव्यात या स्पर्धेचे आयोजन 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होईल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन क्रीडा प्रकाराला 19 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत पुरूष व महिला विभागात देशातील प्रत्येकी अव्वल सहा राज्ये खेळण्यासाठी पात्र झाली आहेत. पुरूष विभागात प्रत्येक झोनमधून कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, दिल्ली, आसाम व यजमान गोवा तर महिला विभागातून यजमान गोव्यासह आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, आसाम हे संघ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन खेळ प्रकारात खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या तयारीचा वेग वाढला
शनिवारी रात्री उशिरा कांपाल येथील क्रीडानगरीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी भेट दिली आणि क्रीडा अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी कामाचा आढावा घेतला. कांपाल येथे क्रीडानगरीत सर्वाधिक खेळांचे आयोजन होणार आहे.
दोन दिवसांत सर्व मैदाने सज्ज
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या सुमारे 10,000 क्रीडापटू, संघातील अधिकारी तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांची निवासाची सोय करण्यात आल्याचे यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले. स्पर्धा होणाऱ्या विविध स्थळांना भेट देण्यात आली असून तेथील कामाचीही पाहणी करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व स्टेडियम्स तसेच इनडोअर्स क्रीडापटूंच्या सेवेसाठी सज्ज असणार असल्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले. सामने होणाऱ्या ठिकाणी आवश्यक ते बदलही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थळांवरील कर्मचाऱ्यांना केवळ सूचना देऊन त्या ठिकाणाहून निघून जाणे योग्य नसल्याने सूचनांचे पालन योग्य तऱ्हेने होत आहे की नाही यासाठी कांपाल क्रीडानगरीची रात्री येऊन पाहणी केल्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले.
क्रीडा नगरी उभारण्याचे काम युद्धपातळीवर
जर्मन हँगर्स या तंत्रज्ञानाचा वापर करून कांपाल क्रीडानगरीत तंबूची उभारणी करण्यात येत आहे. मनोरंजन कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक केंद्रही या ठिकाणी उभे केले जाणार आहे. हे सर्व काम 21 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अधिकारीही अहोरात्र झटत असल्याचे यावेळी गावडे म्हणाले.
पावसाच्या दृष्टीनेही नियोजन
क्रीडानगरीत पावसाची बाधा निर्माण झाली तर पाणी साचणार नाही याची दक्षताही घेण्यात आली असून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ठिकाणी ख•sही खोदण्यात आले असून पाणी खेचून घेण्यासाठी पंप्स देखील उभारण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी, वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्या असून यासाठी दोन नियंत्रण कक्षही असतील. क्रीडा स्पर्धेशी संबंधित प्रत्येक वाहनांवर जीपीएस बसवण्याची योजना आहे. स्पर्धेस्थानी खेळाडूंना येण्यासाठी तसेच कार्यक्रमस्थानी येण्यासाठी विशेष वाहनेही असतील.









