नवीन पंचायत इमारत उभारेपर्यंत स्थलांतराची मागणी : वीज केंद्र, रेशन सोसायटी, आरोग्य केंद्र व नागरिकांसाठी धोकादायक
वार्ताहर /माशेल
भोम येथील भोम अडकोण पंचायतीची इमारत पुर्णपणे जीर्ण झालेली असून कधीही कोसळण्याच्या परिस्थितीत असून येथील पंचायत कर्मचारी जीव मुठीत घेऊन दिवस काढीत आहे. भोम येथील धोकादायक इमारत किमान 35 ते 40 वर्षापुर्वी बांधण्यात आली असून इमारत पुर्णपणे जीर्ण झाली आहे. भिंतीला तडे गेलेले असून मोठी भोके पडलेली आहे. त्याचप्रमाणे स्लॅबचे तुकडे पडत असून आतील लोखंडी सळ्या दिसत आहे. सरपंचाच्या कॅबिनला मोठया भेगा पडलेल्या निदर्शनास येत असून पावसाळयात येथून पाणी झिरपत असल्याने वीजेच्या वाहिन्यावरही परिणाम होऊन शॉर्ट सर्कीटच्या धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
नवीन सुसज्ज इमारत उभारा, पंचायत इमारत कायम वर्दळीचे स्थळ
पंचायत कार्यालयात सचिव व चार कर्मचारी काम करीत आहे. येथे काम करणारे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत असल्याची व्यथा मांडतात. आम्हाला इथून दुसऱ्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी करीत आहे. एका बाजूला वीज केद्राचे कार्यालय असून इथे पाच लाईनमन कार्यरत असतात. येथील भिंतीला मोठे भोक पडले असून आतमध्ये जीवाणू तसेच पावसाचे पाणी येत असल्याचे सांगतात. इमारतीत तळमजल्यावर बेतकी आरोग्य केंद्राची शाखा असून इथे 3 ते 4 कर्मचारी काम करतात. येथील सिलींग पुर्णपणे निकामी झालेले असून वरून स्लॅबचे तुकडे पडत आहे. इथे दिवसाढवळ्या अनेक रूग्ण, तसेच लहान मुलांना उपचारासाठी आणले जाते, यावेळी स्लॅब कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा थेट सवाल येथे भेट देणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय रेशन वाटप करणारी इथे सोसायटी असल्याने धान्य नेण्यासाठी लोकांची इथे गर्दी असते. त्यामुळे एकंदरीत या इमारतीची परिस्थिती पाहता सर्व कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. याविषयी सरपंच दामोदर नाईक यांच्यांशी संपर्क साधला असता इमारतीची परिस्थिती वाईट आहे. तेव्हा नुतन इमारतीसाठी प्रयत्न चालू असून नुतन इमारत होईपर्यंत स्थलांतरीत करणे गरजेचे असल्याचा होरा दिला.









