मंत्री श्रीपाद नाईक यांचे उद्गार : भंडारी समाजाच्या ‘घुमटोत्सवा’चे उद्घाटन
फोंडा : भंडारी समाजाचे गोव्यातील कला व संस्कृतीसह प्रत्येक क्षेत्रात विशेष योगदान राहिले आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम हे महत्त्वाचे साधन आहे. त्यातून समाजाचे अंतरंग उलगड्यास मदत होत असते. आज या समाजाकडे काहीही कमी नाही. संघटना ही समाजाची ताकद असली तरी विश्वासाच्या मजबूत धाग्यावर समाज जोडला गेला पाहिजे, असे उद्गार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. गोमंतक भंडारी समाज युवा समितीतर्फे फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘घुमटोत्सव 2023’ या अखिल गोवा पातळीवरील घुमट आरती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्व. सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या स्मरणार्थ महिला गटासाठी तर स्व. मधुकर पोकू नाईक यांच्या स्मरणार्थ पुऊष गटासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष देवानंद नाईक, खजिनदार जोगुसो नाईक, उत्तर गोवा जि. पं. अध्यक्ष सिद्धेश नाईक, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष रामचंद्र मुळे, संकेत मुळे, दत्तप्रसाद नाईक, अश्विनीकुमार नाईक, फोंडा विभागाचे युवा अध्यक्ष हरिष नाईक, दुर्भाटच्या माजी सरपंच क्षिप्रा मशाल आडपईकर, कुर्टीचे माज सरपंच दादी नाईक, युवा समितीचे अध्यक्ष दिक्षक नाईक आडपईकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दीप प्रज्ज्वलीत कऊन मान्यवरांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अशोक नाईक म्हणाले, केंद्रीय समितीने सन 2018 साली ताबा घेतल्यापासून विविध माध्यमातून संघटना मजबूत करतानाच समाजाचे कार्य तळागाळात पोचविले आहे. आज शिक्षण, नोकरभरती व पदोन्नती मिळवताना आरक्षणाबाबत अजूनही समाजातील घटकांवर अन्याय सुऊ आहे. हा हक्क मिळवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग लवकरच सुऊ होणार असून समाजातील युवकांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. घुमट आरती स्पर्धासारख्या पारंपरिक कला प्रकारांमध्ये महिलांना व्यासपीठ व संधी मिळणे हे अशा उपक्रमांचे यश असल्याचे क्षिप्रा आडपईकर यांनी नमूद केले. हरिष नाईक व अन्य मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक दिक्षक नाईक आडपईकर यांनी केले. पहिल्या दिवशी महिलांसाठी तर दुसऱ्या दिवशी पुऊष गटासाठी ही स्पर्धा होणार आहे.









