भेटवस्तूंच्या मोहापायी आयुष्यभराची कमाई गमावली : परदेशी मित्राची प्रेंड रिक्वेस्ट पडली महागात : 7 लाख 40 हजार रुपये भामट्यांच्या बँक खात्यावर केले जमा
बेळगाव : भेटवस्तूंचा मोह कोणाला नसतो? त्यातही आपल्याला मिळणारी भेट किमती असेल तर ती मिळविण्याचा मोह आणखी वाढतो. हा मोहच सायबर गुन्हेगारांसाठी फायद्याचा ठरू लागला आहे. लाखो रुपयांची भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवत सावजाला गंडविण्याचे प्रकार सुरूच आहेत. बेळगाव येथील एका परिचारिकेलाही भेटवस्तूंचा मोह चांगलाच महागात पडला आहे. फुकटात काही तरी मिळत असेल तर ते मिळविण्यासाठी माणूस धडपड करतोच. मात्र, काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कोणीच कोणाला फुकट काहीच देत नाही. प्रत्येकाला याचा अनुभव असतोच, तरीही भेटवस्तू म्हटली की या अनुभवाचा विसर पडतो आणि सावज आपसुक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकते. 7 सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एका 48 वर्षीय परिचारिकेला सायबर गुन्हेगारांनी गंडविले आहे. यासंबंधी शहर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक संजीव कांबळे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र, परिचारिकेला गंडवणारा भामटा कोण? तो कोठला आहे? याचा तपशील मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणेला बरीच धडपड करावी लागत आहे. परिचारिकेच्या फेसबुकवर एका परदेशी नागरिकाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. परिचारिकेने ती स्वीकारली. त्यानंतर गुड मॉर्निंगचे मेसेज सुरू झाले. मेसेंजरवर चॅटिंगचा वेगही वाढला. न पाहिलेल्या परदेशी मित्रावर विश्वास अधिक दृढ झाला. त्याच्यावर विश्वास बळावल्यानंतर परदेशी मित्राने परिचारिकेला एक मेसेज पाठविला, ‘मला तुझ्यासाठी काही तरी पाठवायचे आहे, प्लीज तुला त्याचा स्वीकार करावा लागेल’ असा तो मेसेज होता.
तब्बल 50 लाखांची भेटवस्तू
‘तब्बल 50 लाखांची भेटवस्तू पाठविली आहे. एअरपोर्टवर तपासणीच्या वेळी अधिकाऱ्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली आहे. पाऊंडच्या माध्यमातून पाठविलेली भेटवस्तू भारतीय चलनात रूपांतर करण्यासाठी तुला काही किरकोळ रक्कम भरावी लागणार. तेवढी रक्कम भरून ती सोडवून घे. तुलाच कळेल, मैत्रीसाठी आपण काय पाठविले आहे’ असे परदेशी मित्राने सांगितले. या संभाषणानंतर लगेच विमानतळावरून परिचारिकेला फोन येतो, ‘तुमच्या नावे परदेशातून मोठी भेटवस्तू आली आहे, ती सोडविण्यासाठी तुम्हाला थोडी रक्कम भरावी लागणार’ असे सांगण्यात आले. याची कल्पना मित्राने परिचारिकेला आधीच दिली होती. त्यामुळे तिने तयारी दर्शविली. भामटे सांगतील तसे त्यांच्या खात्यावर ती पैसे जमा करत गेली. पंधरवड्यात 7 लाख 40 हजार रुपये तिने भामट्यांच्या बँक खात्यावर जमा केले. परिचारिकेसाठी ही रक्कम मोठी होती. त्यांनी सांगतील ते सर्व ऐकल्यानंतरही भेटवस्तू यायला विलंब का होत आहे? असा संशय बळावला. तिने पुन्हा पैसे भरण्यासाठी आग्रह धरणाऱ्या भामट्यांकडे यासंदर्भात विचारणाही केली. त्यांनी आणखी काही प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत. थोडी रक्कम पाठवा, असे सांगितले. त्यावेळी परिचारिकेला आपण फसलो गेलो, याची कल्पना आली. तिने थेट पोलीस स्थानक गाठले.
दोन वर्षात दहाहून अधिक घटना
चालू वर्षी बेळगावात अशा पद्धतीने घडलेली ही पहिली घटना आहे. गेल्या दोन वर्षात अशा दहाहून अधिक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात भामट्यांच्या बँक खात्यातून थोडी रक्कम परत मिळविल्याचीही उदाहरणे आहेत. सावजाने रक्कम जमा केल्यानंतर ते सीमकार्ड बदलतात. सोशल मीडियावरील अकौंटही बंद पडतात. ज्या खात्यात रक्कम जमा करून घेण्यात आली आहे, त्या खात्यातून दुसऱ्या खात्यात ती वळविण्यात येते. जेणेकरून पोलिसात तक्रार झाली तरी ती रक्कम जप्त होऊ नये, यासाठी ते काळजी घेतात. 27 डिसेंबर 2020 रोजी टिळकवाडी येथील एका वृद्धेच्या बाबतीतही अशीच घटना घडली होती. परदेशातून मोठी भेटवस्तू पाठविण्याचे सांगून तब्बल 88 लाख रुपये जमा करून घेण्यात आले होते. बँकेतून कर्ज काढून, मैत्रिणींकडून उसने घेऊन, घरातील दागिने विकून ती वृद्धा भामटे सांगतील तसे पैसे भरतच गेली. या काळात सावजाला पुसटसाही संशय येऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेतलेली असते. सावजाच्या मनावर पूर्णपणे मोहिनी घातली जाते. त्यामुळे कोणीतरी आपल्याला एक चांगला मित्र भेटला आहे. आपल्यातील मैत्रीखातर हा परदेशी मित्र मोठी भेटवस्तू पाठवतो आहे, या भ्रमात राहून सावज भामटे सांगतील तसे पैसे भरतच राहतात. शेवटी सावजाची फसवणूक होते. बेळगाव परिसरात असे प्रकार वाढले आहेत.
महिला ठरताहेत सॉफ्ट टार्गेट
जगात कोणीच कोणाला फुकट काही देत नाहीत, हे सगळ्यांनाच माहीत असते. मात्र, डॉलर व पौंडमधून परदेशातून आपल्याला मोठी भेटवस्तू मिळणार या आशेने हुरळून जाऊन अनेक जण फशी पडत आहेत. फुकट भेट वस्तूच्या मोहापायी आयुष्यभर कमावलेली कमाई भलत्याच्याच खिशात घालत आहेत. सायबर गुन्हेगार खास करून महिलांना आपले लक्ष्य बनवत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी फेसबुक व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतानाच विचार करावा. भेटवस्तू पाठविण्याचे सांगून महिलांकडून आपल्या खात्यात रक्कम जमा करून घेणे ही सायबर गुन्हेगारांची गुन्ह्याची पद्धत आहे. भेटवस्तूंचा मोह टाळला नाही तर फसवणूक अटळ आहे. त्यामुळे भेटवस्तूंच्या नादी लागू नये, असे आवाहन शहर सीईएनचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांनी केले आहे.









