ढगाळ वातावरण : दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा
बेळगाव : शहरात रविवारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन केवळ पावसाचा शिडकावा झाला. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होऊ लागला आहे. त्याबरोबर ऑक्टोबर हिटच्या झळादेखील असह्या होऊ लागल्या आहेत. सकाळी धुके, दुपारी कडक ऊन आणि रात्री उष्मा असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.यंदा जूनपासूनच सरासरी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी समस्या गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे परतीच्या पावसावर अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, अद्याप म्हणावा तसा परतीचा पाऊसदेखील बरसला नाही. त्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. वाढती उष्णता आणि ढगाळ वातावरणामुळे दमदार पाऊस होईल असे वाटत होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आहे. काही भागात किरकोळ पाऊस झाला तरी शहरात केवळ शिडकावा झाला आहे.किरकोळ पाऊस वगळता मागील दोन महिन्यांत पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणीसमस्या निर्माण होऊ लागली आहे. तर पावसाअभावी शेती पिके करपून जाऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरादेखील आभाळाकडे लागल्या आहेत.
ऑगस्ट, सप्टेंबर पूर्णपणे कोरडा गेला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाकडे साऱ्यांच्या नजरा होत्या. मात्र, आता ऑक्टोबरमधील पहिल्या पंधरवड्यातदेखील पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत परतीचा पाऊस बरसणार का? याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटच्या झळा शहरवासियांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना परतीच्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, पहिला पंधरवडा वाया गेला आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ शिडकावा झाला. भविष्यातील पाणी समस्या दूर होण्यासाठी परतीच्या पावसाची दमदार एंट्री होणे आवश्यक आहे.









