नवरात्रोत्सव काळात देवीची विशेष पूजा
वार्ताहर /बाळेकुंद्री
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या दर्शनाचा लाभ रविवारी घटस्थापनेच्या दिवशी लाखो भाविकांनी तेल अर्पण करून घेतला.भाविकांनी ‘उदो ग आई उदो उदो…’चा गजर करून यल्लम्मा डोंगर परिसर अक्षरश: दणाणून सोडला. रविवारी देवस्थान समिती अध्यक्ष बसय्या हिरेमठ, मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसपीबी महेश, कोळप्पगौड गंदिगवाड, वाय. वाय. काळप्पनावर, अल्लमप्रभू प्रभून्नावर, नागरत्ना चोळी, अरविंद मळगे व पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना पूजाविधी पार पडला. डोंगरावर कडक उकाडा जाणवत असला तरीही भाविकांची अलोट गर्दी झाली होती. भाविकांना सर्व सुविधा पुरविल्या जात असल्याचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसपीबी महेश यांनी सांगितले. नवरात्रोत्सव काळात यल्लम्मा देवस्थानला विशेष महत्त्व असून देवीची विविध रुपात विशेष पूजा बांधण्यात येत आहे. रोज पहाटे अभिषेक, होम, विशेष पूजा, आरती आदी धार्मिक विधी होत आहेत.









