पहिल्या दिवशी धावल्या 20 बस : भक्तांच्या संख्येत वाढ अपेक्षित : परिवहनला दिलासा
बेळगाव : भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर रविवारपासून जादा बस सोडल्या आहेत. पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानकातून 20 बस सौंदत्तीकडे धावल्या. भक्तांच्या सोयीखातर नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बससेवा पुरविण्यात आली आहे. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे या विशेष यात्रा बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला आहे.नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती येथील यल्लम्मादेवीचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. यासाठी या काळात विशेष बससेवा पुरविली आहे. परिवहनकडून 60 बसेसची तजवीज करण्यात आली आहे. शिवाय बाहेरून 30 बस मागविण्यात आल्या आहेत. अशा एकूण 90 बसेस या मार्गावर धावणार आहेत. यंदा जूनपासून शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी महिला भक्तांचा ओघ वाढणार आहे.
परिवहनकडून सण-उत्सव आणि यात्रा-जत्रा काळात अतिरिक्त बससेवा पुरविली जाते. आता यात्रा-जत्रांसाठी बसेस धावत आहेत. त्यामुळे परिवहनच्या महसुलात भर पडू लागली आहे. यल्लम्मा डोंगरावर भक्तांची संख्या वाढणार आहे. दसरा उत्सवापर्यंत दर्शनासाठी ये-जा करणारे भक्त अधिक आहेत. बेळगाव, संकेश्वर, खानापूर, गडहिंग्लज, चंदगड आदी भागांतून सौंदत्ती यल्लम्माकडे जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. त्यामुळे या विशेष बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळेल, अशी आशा परिवहनला आहे. बेळगाव-सौंदत्ती तिकीट दर 120 रुपये तर लहान बालकांसाठी अर्धे म्हणजे 60 रुपये इतका तिकीट दर आकारला जात आहे. महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे.
नवरात्रोत्सवात 90 बसेसची तजवीज
नवरात्रोत्सव काळात 90 बसेसची तजवीज केली आहे. बेळगाव-सौंदत्ती मार्गावर विशेष बससेवा चालू आहे. रविवारी पहिल्या दिवशी 20 हून अधिक बसेस सौंदत्तीकडे धावल्या. महिलांना मोफत प्रवासाची सोय आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर









