प्रक्रिया उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत : सुरळीत वीजपुरवठ्याची करण्याची मागणी
बेळगाव : राज्य सरकारने एकीकडे घरगुती वीज मीटरधारकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत केली. परंतु दुसरीकडे अघोषित भारनियमन सुरू केले आहे. यामुळे अनेक लघु उद्योग अडचणीत सापडले असून कामगारांचे पगार काढणेही कठीण झाले आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. मोठ्या उद्योगांबरोबरच शहरासह ग्रामीण भागातील लघु उद्योगांवर अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. मागील दोन महिन्यांपासून विजेच्या समस्यांमध्ये हळूहळू वाढ झाली. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ग्रामीण भागात दिवसातून तीन ते चारवेळा वीजपुरवठा बंद केला जात आहे. जनरेटरच्या साहाय्याने उद्योग सुरू ठेवणे लघु उद्योजकांना परवडणारे नसल्याने वीज येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. विशेषत: ग्रामीण भागात लोणचे, पापड, काजू प्रक्रिया, अगरबत्ती, साबण निर्मिती, कपडे शिलाई, खाद्य पदार्थ तयार करणे असे उद्योग सुरू आहेत. परंतु विजेच्या समस्यांनी हे उद्योग दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरवाढ केली मग सुरळीत वीज द्या
राज्य सरकारने घरगुती ग्राहकांना मोफत वीज दिली असली तरी व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल कनेक्शनच्या बिलात मोठी वाढ केली. अचानक केलेल्या या दरवाढी विरोधात राज्यातील चेंबर ऑफ कॉमर्सने विरोध केला. परंतु विरोध न जुमानता राज्य सरकारने दरवाढ केली. एकीकडे दरवाढ केली असली तरी सुरळीत वीजपुरवठा करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांना विचारले असता वरिष्ठांना विचारा अशी उत्तरे दिली जात असल्याने उद्योजकांनी दाद मागायची कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्योजक देशोधडीला लागणार
हेस्कॉमकडून अघोषित भारनियमन केले जात असल्याने उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लघु उद्योगांना विजेच्या लपंडावामुळे सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर काहीशी परिस्थिती सुधारते ना सुधारते तोच आता विजेच्या समस्यांनी व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. हेस्कॉमने कमर्शियल वीज दरात मोठी वाढ केली असतानाही सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याने उद्योजक देशोधडीला लागणार आहे.
– रमेश देसूरकर (अध्यक्ष-बेळगाव मायक्रो इंडस्ट्रिज)
हेस्कॉमने यावर तोडगा काढावा
ग्रामीण भागात विजेच्या समस्या कैकपटीने वाढल्या आहेत. अचानक वीजपुरवठा ठप्प करण्यात येत असल्याने कामगारांना काम बंद ठेवावे लागत आहे. बॉयलर व मशीनच चालली नाही तर कामगारांना काम कसे मिळणार? यामुळे उद्योजकांना पगार देणे परवडत नाही. विजेच्या समस्यांनी उद्योग चालविणे कठीण झाले असून हेस्कॉमने यावर तोडगा काढावा.
– प्रसाद बोकडे (अध्यक्ष- बेळगाव ग्रामीण काजू प्रक्रिया उद्योग)









