वृत्तसंस्था/ कौलालंपूर
येथे सुरू झालेल्या मर्डेका चषक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सलामीच्या सामन्यात यजमान मलेशियाने भारताचा 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला. या पराभवामुळे भारतीय फुटबॉल संघाचे या स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
मलेशिया आणि भारत यांच्यातील या सामन्यात सातव्या मिनिटाला डियॉन कुल्सने मलेशियाचे खाते उघडले. 13 व्या मिनिटाला भारताच्या नाओरेम महेश सिंगने आपल्या संघाला बरोबरी साधून देताना गोल नोंदवला. 20 व्या मिनिटाला अमिनने पेनल्टीवर मलेशियाचा दुसरा गोल केला. मध्यंतराला चार मिनिटे बाकी असताना फैजल हलिमने मलेशियाचा तिसरा गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत मलेशियाने भारतावर 3-1 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर 52 व्या मिनिटाला भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने गोल नोंदवल्याने भारताने मलेशियाची आघाडी थोडी कमी केली. 57 व्या मिनिटाला चेंगटेला गोल नोंदवण्याची सिंधू मिळाली होती पण तीन वाया गेली. 61 व्या मिनिटाला कोर्बिन आँगने मलेशियाचा चौथा गोल नोंदवून भारताचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले. मर्डेका चषक फुटबॉल स्पर्धेला मिनी आशिया चषक म्हणून ओळखले जाते. या स्पर्धेमध्ये भारत, मलेशिया आणि ताजिकस्तान या संघांचा समावेश आहे. आता मलेशियाचा अंतिम सामना ताजिकस्तानबरोबर 17 ऑक्टोबरला होणार आहे.









