वृत्तसंस्था/ व्हॅनेटा (फिनलँड)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू तसेच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेती पी. व्ही. सिंधूने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूने व्हिएतनामच्या नेग्युयेनचा 91 मिनिटांच्या कालावधीत 20-22, 22-20, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. या सामन्यात आठव्या मानांकित सिंधूला पहिला गेम गमवावा लागला होता पण त्यानंतर तिने पुढील दोन गेम्समध्ये आपला डावपेचात बदल करत नेग्युयेनला पराभूत केले. आता सिंधूचा उपांत्य फेरीचा सामना चीनच्या वेंग यी बरोबर होणार आहे. चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात सिंधूने विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूरवरील स्पर्धेत चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी तिने स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच मलेशिया मास्टर्स आणि कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिने उपांत्य फेरी गाठली होती.









