लष्कर-ए-तोयबाच्या मॉड्युलचा पर्दाफाश : जम्मू-काश्मीरच्या दोन दहशतवाद्यांना अटक
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबच्या विशेष पोलीस पथकाने लष्कर-ए-तोयबा मॉड्यूलचा पर्दाफाश करत दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष पथकाने या दहशतवाद्यांकडून दोन आयईडी, दोन हँडग्रेनेड, एक पिस्तुल, दोन मॅगजीन, 24 जिवंत काडतूसे, एक टायमर स्विच, 8 डेटोनेटर आणि 4 बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. हे दहशतवादी पंजाबमध्ये मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत होते.
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फिरदौस अहमद भटच्या इशाऱ्यानुसार पंजाबमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. पंजाबमध्ये आगामी काळात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे प्लॅनिंग सुरू होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दहशतवादी मॉड्यूल नष्ट करण्यात आल्याने राज्यात मोठा घातपात टाळण्यास यश मिळाले आहे. राज्यात कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असून पोलीस हाय अलर्टवर असल्याचे पंजाब पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले आहे.
मागील 15 महिन्यांमध्ये पंजाब पोलिसांनी दहशतवादविरोधात मोठे यश मिळविले आहे. यादरम्यान पोलिसांनी 197 दहशतवादी आणि कट्टरवाद्यांना अटक केली आहे. तर 32 दहशतवादी मॉड्यूल्सचा भांडाफोड केला आहे.
बीएसएफने शुक्रवारी अटारी सीमेवरील इंटीग्रेटेड चेक पोस्टवर 11 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. बांगलादेशी नागरिक इंटिग्रेटेड चेकपोस्टची भिंत ओलांडून पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होते. या बांगलादेशी नागरिकांमध्ये 2 महिला तर 5 अल्पवयीनांचा समावेश आहे.









