तीन एलपीजी सिंलिडर जोडलेले आयईडी हस्तगत
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर-कुपवाडादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील गणपोरा भागात दहशतवाद्यांनी आयईडीला जोडून 10 किलोग्रॅमचे तीन एलपीजी सिलिंडर बॉम्ब पेरले होते. आयईडी ज्या ठिकाणी पेरण्यात आला होता, तेथून दिवसभरात सुमारे 1000 सार्वजनिक वाहने आणि 200 सुरक्षा दलांची वाहने गेली होती. झुडुपांमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटकांवर एअर डिफेन्स युनिटची नजर पडल्याने हल्ला टाळता आला आहे.
या स्फोटकांविषयी सैन्याला माहिती देण्यात आली. भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिमेच्या अंतर्गत आयईडी बॉम्ब निकामी केला आहे. चिनार कॉर्प्सने सोशल मीडियावर बॉम्ब नष्ट करतानाची छायाचित्रेही शेअर केली आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दल सातत्याने मोहीम राबवत आहे. काश्मीर क्षेत्रात जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत 47 दहशतवादी मारले गेले आहेत. यातील 37 दहशतवादी हे विदेशी होते. तर राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात चालू वर्षी तीन मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. राजौरीच्या डांगरीमध्ये 1 जानेवारी तर पुंछच्या तोता गलीमध्ये 20 एप्रिल रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यांमध्ये 10 सैनिक हुतात्मा झाले होते.









