गुळे पेट्रोल पंपनजीकची घटना : दोघेही पेट्रोल पंपावरील कामगार
काणकोण : काणकोण नगरपालिका क्षेत्रातील एकमेव पेट्रोल पंप असलेल्या गुळे येथील श्री आर्यादुर्गा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन व्यक्तींना पंपानजीकच्या विहिरीत बुडून मृत्यू येण्याची अत्यंत दुर्दैवी घटना काल शुक्रवारी संध्याकाळच्या 7.30 च्या दरम्यान घडली. मयत व्यक्तींची नावे नोमी गावकर (43 वर्षे) आणि बारकेलो गावकर (40 वर्षे) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही व्यक्ती पंपावर काम करत होत्या. एक व्यक्ती प्रथम विहिरीत उतरली. त्यावेळी सदर व्यक्ती बुडत असल्याचे दिसताच दुसऱ्या व्यक्तीने त्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली आणि दुर्दैवाने दोन्ही व्यक्तींना बुडून मृत्यू येण्याची घटना या ठिकाणी घडली. विशेष म्हणजे दोन्ही व्यक्ती पट्टीच्या पोहणाऱ्या असूनही गुदमरून त्यांचा अंत झाला. या घटनेची खबर मिळताच काणकोणच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील एका व्यक्तीला प्रथम बाहेर काढले. मात्र दुसऱ्या व्यक्तीला बाहेर काढायला बराच वेळ लागला. दोघांनाही बाहेर काढेपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. दोन्ही व्यक्ती विवाहित असून त्यांना मुले आहेत.
जमावाकडून पेट्रोल पंप कार्यालयाची नासधूस
या दोघांपैकी एक व्यक्ती गुळे, तर दुसरी व्यक्ती गोकुल्डे येथील असून या घटनेची खबर मिळताच या दुर्घटनेत बळी गेलेल्यांचे नातेवाईक आणि हितचिंतकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पेट्रोल पंपाच्या मालकाने घटनास्थळी हजर राहावे, अशी मागणी केली. जोपर्यंत मालक येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा हट्ट नातेवाईकांनी धरला. सदर पेट्रोल पंपाचे मालक मडगावला राहतात. त्यानंतर संतापलेल्या जमावाने आर्यादुर्गा पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची आणि पेट्रोल पंपाचीही नासधूस केली.
निरीक्षक, मामलेदार, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून समजूत
खवळलेल्या जनसमुदायाला आवरताना पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस आणि इतरांना नाकीनऊ झाले. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी गर्दी होती. खवळलेल्या जनसमुदायाकडून विपरित घटना घडू नये यासाठी निरीक्षक गावस यांनी नंतर अधिक पोलीस कुमक मागविली. गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रिफा बार्रेटो यानी पंचनामा करून त्या पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले आणि खवळलेल्या जमावाची समजूत काढून त्यांना पांगविण्यात यश मिळविले.
40 वर्षांपूर्वी स्व. रामकृष्ण प्रभुदेसाई यांनी सुरू केलेल्या या पेट्रोल पंपाचे नुकतेच त्यांच्या मुलाने नूतनीकरणाचे काम हातात घेतले होते. किती तरी वर्षांनंतर या पंपावर निवारा शेड उभारण्यास त्याचप्रमाणे जमिनीवर पेव्हर्स घालण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. या पंपाच्या सभोवताली फुलझाडांची लागवड करण्याची तयारी मालकाने ठेवली होती आणि कामगार देखील आपल्या घरच्याप्रमाणे आपुलकीने या ठिकाणी काम करत असताना घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसराला सध्या शोकसागरात बुडविले आहे.









