बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे यावर्षी रौप्यमहोत्सवी दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. दौडसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. फुलांची उधळण करत दौडचे जागोजागी स्वागत केले जाणार आहे. बेळगावमधील तरुण एकवटून त्यांच्यामध्ये देव, देश आणि धर्म यांचे स्फुल्लिंग चेतविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर्षीचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने दुर्गामाता दौड उत्साहात साजरी केली जाणार आहे. 1999 साली केवळ 23 कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन संभाजी भिडे गुरुजींच्या आदेशानुसार दुर्गामाता दौड सुरू केली. आज 25 वर्षांनी दौडमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या 25 ते 40 हजारांपर्यंत पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगत आई भवानीच्या नावाचा जागर करत दुर्गामाता दौड काढली जाते. बेळगावमधील दौड म्हणजे एक उत्सवच असतो. भल्यामोठ्या रांगोळ्या, फुलांचा वर्षाव तसेच देशप्रेमाने भारलेले वातावरण दौडमध्ये पाहायला मिळते. केवळ सकाळी उठून दौडमध्ये धावणे म्हणजे राष्ट्रभक्ती होत नाही. तर प्रत्येक तरुणाने वर्षभर देव, देश आणि धर्माच्या कार्यामध्ये अग्रणी रहावे, असे शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात येते. दुर्गामाता दौडमधून प्रेरणा घेतलेल्या मुली-मुले आज बीएसएफ, सैन्यात सहभागी झाले आहेत. तसेच अनेक जण आपला नोकरी-व्यवसाय सांभाळून दौडमध्ये सहभागी होतात. जात-पात न पाहता तरुणांना एकत्रित करणारी संघटना म्हणजे शिवप्रतिष्ठान अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
दौडची शिस्त व नियम
- दौड ठरलेल्या वेळेप्रमाणेच व ठरलेल्या ठिकाणाहूनच सुरू होईल.
- दौडची सुरुवात प्रेरणा मंत्र व आरतीने होईल.
- प्रारंभी भगवा ध्वज असेल त्यानंतर शस्त्रपथक, ध्वजपथक, त्यानंतर ज्या भागात दौड आहे, त्या भागातील भगवे फेटेधारी व त्यानंतर कार्यकर्ते असतील.
- शिवभक्तांनी डोक्यावर पांढरी भारतीय टोपी अथवा भगवा फेटा परिधान करावा.
- स्वागताच्या वेळी रांगोळ्यांमध्ये ओम, स्वस्तिक अथवा हिंदू देवदेवतांची चित्रे काढू नयेत.
- इतर संघटना, संस्था, मंडळे यांची टी-शर्ट्स घालू नयेत.
- सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश देणारी गीते खड्या आवाजात म्हणावीत.
- अवांतर घोषणाबाजी, हुल्लडबाजी करू नये.
रविवार दि. 15 रोजीचा दौडचा मार्ग
रविवारी पहाटे शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्राrनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड चौथा क्रॉस, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड तिसरा व दुसरा क्रॉस, संभाजी गल्ली, एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर मंदिरात सांगता होणार आहे.









