अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणार कार्यक्रम : उपसमितीच्या बैठकीत दिली माहिती
बेळगाव : कित्तूर उत्सवाला व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना थेट उत्सव पाहता यावा यासाठी कित्तूर उत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रसिद्धी उपसमितीचे अध्यक्ष व माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी कित्तूर येथे झालेल्या उपसमितीच्या बैठकीत पत्रकारांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील माहिती दिली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव समितीकडून पुरविले जाणारे बॅनर, होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, माहितीपत्रके व इतर प्रचार साहित्याचा वापर करून अधिकाधिक प्रचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत कित्तूर उत्सवाच्या यशस्वीतेसंबंधी पत्रकारांनीही सल्ले दिले. एलईडी स्क्रीन लावण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे. उत्सवाच्या काळात सुसज्ज अशी माध्यम केंद्रे सुरू करण्यात यावीत. काकती येथेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असा सल्ला पत्रकारांनी दिला. यावेळी माहिती खात्याचे अनंत पप्पू, एम. एल. जमादार आदी उपस्थित होते.









