तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती : नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन
खानापूर : खानापूर तालुक्यातील सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दि. 18 ऑक्टोबर रोजी नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या कल्याण मंडपात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर राहणार असून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित राहून तालुक्यातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करणार असल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी आपल्या कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले, शासनाच्या सुचनेनुसार सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तालुकास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुकास्तरीय जनता दर्शनचा पहिला कार्यक्रम जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सर्व शासकीय खात्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सामान्य जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी वेळ देण्यात येणार असून यासाठी ज्यांना आपल्या समस्यांबाबत अर्ज करायचा आहे. त्यांच्यासाठी या ठिकाणी विभागवार काऊंटर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आपला अर्ज द्यावा, तसेच ज्यांना तोंडी समस्या अथवा तक्रार मांडायची आहे. त्यांनाही मुभा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या जनता दर्शन कार्यक्रमासंदर्भात तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी शुक्रवारी सर्व तालुकास्तरीय खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.
जनतेला समस्या मांडण्यासाठी नंदगड येथील जनता दर्शन कार्यक्रमाच्या स्थळावर दहा काऊंटर निर्माण करण्यात येणार असून यात टेबल क्रमांक 1 महसूल विभाग, क्रमांक 2 ग्राम पंचायत आणि जिल्हा पंचायतबाबत, क्रमांक 3 शैक्षणिक, क्रमांक 4 नगरपंचायत, नगरप्रशासक, क्रमांक 5 शेतकी विषयक, क्रमांक 6 पीडब्लूडी, दवाखाना, अन्नपुरवठा विभाग, मत्स्यपालन, गृहनिर्माण, क्रमांक 7 फलोद्यान, वनखाते, हेस्कॉम, केएसआरटीसी, युवा क्रीडा खाते, क्रमांक 8 सोशल वेल्फेअर, ओबीसी आणि अल्पसंख्याक, कन्नड आणि संस्कृती, वाणिज्य आणि इंडस्ट्रीज, माग आणि टेक्स्टाईल, अबकारी आणि रेशीम. क्रमांक 9 पशुसंगोपन, लघु आणि पाटबंधारे खाते, सहकार विभाग, भूगर्भ खाते, सर्वेक्षण आणि एडीएलआर, एनएच फोर ए, भूमी अधिग्रहण, क्रमांक 10 भूमीअधिग्रहण, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रदूषण, लिड बँक, केएसआरटीसी, धर्मदाय खाते यासह इतर खात्यांच्या तक्रारी या विभागात घेण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील नागरिकांनी नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात सकाळी 10 पासून उपस्थित राहून आपल्या तक्रारी आणि समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.









