हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची तत्परता : गावकऱ्यांतून समाधान
वार्ताहर /किणये
बहाद्दरवाडी गावच्या वेशीत असलेला ट्रान्स्फॉर्मर बुधवारी दुपारी अचानक खराब झाला. यामुळे दुपारी तीन वाजल्यापासून गावातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. गावातील ट्रान्स्फॉर्मर खराब झाला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना दिली. पिरनवाडी विभागीय कार्यालयाचे हेस्कॉमचे अधिकारी दीपानंद व लाईनमन एस. एन. नदाफ आदी बहाद्दरवाडी गावात दाखल झाले. त्यांनी गावातील सदर ट्रान्स्फॉर्मरची पाहणी केली. आणि हेस्कॉमचे ग्रामीणचे वरिष्ठ अधिकारी चिकोर्डे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून बहाद्दरवाडी गावात नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याची मागणी केली.
गावच्या वेशीतील मुख्य ट्रान्स्फॉर्मर खराब झाला असल्यामुळे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या चार तासात नवीन ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करून दिला आणि अधिकारी दीपानंद व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळच्या दरम्यान नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला. यावेळी माजी एपीएमसी सदस्य मोनाप्पा पाटील व गावकरी उपस्थित होते. बहाद्दवाडी गावातील खराब झालेला ट्रान्स्फॉर्मर अवघ्या चार तासात हेस्कॉमने नवीन बसवून दिला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हेस्कॉमच्या या अधिकाऱ्यांची कार्यतत्परता या कार्यातून दिसून आल्याची प्रीतिक्रिया करण्यात येत होती.









