वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हमासच्या इस्रायलवरील भीषण हल्ल्यामुळेच मध्यपूर्वेत युद्धाची स्थिती ओढवली आहे, असे स्पष्ट विधान काँग्रेस नेते आणि भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. हमासमुळेच हे युद्ध होत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण आता सर्वाधिक प्राधान्य हिंसाचार रोखण्याला दिले गेले पाहिजे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. या संदर्भात त्यांनी काँग्रेसपेक्षा काहीशी वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून येते, असे मत काही राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रस्ताव संमत केला होता. त्यात पॅलेस्टाईचे समर्थन करण्यात आले होते. त्यामुळे या पक्षावर मोठी टीका सोशल मिडियावर होत आहे. या निर्णायक स्थितीत काँग्रेस पॅलेस्टाईनचे समर्थन करुन स्वत:चा पक्षपाती कल दाखवून देत आहे, अशी टिप्पणी सर्वसामान्य नागरीकांकडून केली जात आहे. चिदंबरम यांनी त्यासंदर्भात आता हमासवरही टीका करुन सारवासारवी करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे मत व्यक्त होत आहे. आता जगाने एकत्र यावे आणि हिंसाचार थांबवावा असे आवाहन चिदंबरम यांनी केले. तथापि, त्यांनीही हमासचे प्रत्यक्ष नाव घेऊन तिच्या दहशतवादी कृत्यावर टीका करणे टाळले आहे. काँग्रेसने तिच्या प्रस्तावात शेवटच्या परिच्छेदात मध्यपूर्वेतील संघर्षाचा उल्लेख करत युद्धासंबंधी चिंता व्यक्त केली होती.









