वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमधील विद्यापीठांच्या उपकुलगुरुंच्या नियुक्त्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी राज्याचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपल्या निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रणाचे पत्र पाठविले आहे.
राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात विद्यापीठांच्या उपकुलगुरुंच्या नियुक्त्या केल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने या नियुक्त्यांना आव्हान दिले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राज्यपालांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची सूचना केली. जोपर्यंत राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात सहमती होऊन हे प्रकरण संपत नाही, तोपर्यंत नवनियुक्त उपकुलगुरुंना त्यांचे वेतन देऊ नये, असा आदेशही न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी पत्र पाठविले आहे.
आदेश कायदेशीरच
राज्यपालांनी राज्यातील 11 विद्यापीठांच्या उपकुलगुरंची पदे भरण्यासाठी आदेश काढला होता. या आदेशानुसार नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. राज्यपालांचा हा आदेश कायद्याला धरुनच आहे. या आदेशात काहीही बेकायदेशीर नाही, असा निर्णय राज्याच्या उच्च न्यायालयाने दिला होता. तसेच नियुक्त्या वैध ठरविल्या होत्या. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
समितीचा आदेश
विद्यापीठांच्या उपकुलगुरुंची पदे भरण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी. या समितीत शिक्षणतज्ञ, मान्यवर शास्त्रज्ञ तसेच इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींचा समावेश असलेली एक समिती स्थापन करावी, असे मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तथापि, राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील मतभेद संपले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी आपसात चर्चा करुन सहमती घडविण्यासाठी वेळ दिला आहे.









