प्रतिनिधी डिगस
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगिभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी कुडाळ तालुक्यातील श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड या विद्यालयामध्ये परसबागेतील शेती हा उपक्रम राबविण्यात आला.सदर शाळेमध्ये वेगवेगळे कौशल्य पूरक नवोपक्रम राबविले जातात. सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात प्रशालेने परसबागेतील शेती हा उपक्रम राबविला आहे.यासाठी प्रशालेच्या परिसरातील 2 गुंठे क्षेत्रात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या फळभाज्यांची लागवड केली आहे. वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये दोडकी , कारली, तसेच फळभाज्यांमध्ये वांगी , भेंडी यांची लागवड केली आहे. सुरण, मिरची, हळद, या पिकांची देखील लागवड केली आहे . दरदिवशी शालेय पोषणआहारात सर्व विद्यार्थ्यांना किमान चार किलो भाजीपाल्याची गरज असते. सध्या विद्यार्थ्याना याच परसबागेतील दोडकी, कारली , भेंडी या भाज्यांचा समावेश शालेय पोषण आहारात केला जातोय. विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, शारीरिक श्रमाची सवय लागावी , ताजा भाजीपाला पोषण आहारात मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम या प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र राठोड, शिक्षक संजय पवार, स्वप्नील खांबल तसेच भगीरथ ग्रामविकास झारापचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली केला गेला आहे.









