केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे प्रतिपादन : आगामी काळातही चिंता कायम राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक देशांच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अनेक बाजारपेठांमध्ये मागणी कमी होऊ शकते. सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरपेक्षा जास्त होती. इस्रायलमधील संकटामुळे किमतीत वाढीची शक्यता दिसते, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी सांगितले आहे.
केपीएमजी इनोव्हेशन अँड एनर्जीच्या 14 व्या आवृत्तीला संबोधित करताना पुरी म्हणाले की, आयात करणाऱ्या देशांच्या आणि विशेषत: जे अधिक तेल खरेदी करतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेल्यास आर्थिक विकासात अडथळे संभवू शकतात.
बुधवारी संध्याकाळी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 86.64 डॉलर होती आणि त्यात सुमारे एक टक्क्यांची घसरण झाली. ते म्हणाले, ‘मला वाटते की अर्धे जग आर्थिक मंदीच्या गर्तेत आहे आणि अर्धे जग या मंदीचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, भारत 6.3 टक्के दराने वाढेल परंतु माझ्या मते भारत यापेक्षा जास्त वाढेल. अनेक आयातदार देश जागतिक वाढीस हातभार लावतात आणि यातूनच चिंतेची चिन्हे जाणवू लागतात.
तेलाची उपलब्धता भारतासाठी विशेष महत्त्वाची
केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की, सरकार इस्रायलमधील परिस्थितीचा रिअल-टाइम आधारावर आढावा घेत आहे. ते म्हणाले, ‘हमास-इस्रायल संकट वाढेल, असे वाटते. या परिस्थितीवर जागतिक बाजार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.









