शाहिद मेमन यांचे मत : जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे मोहम्मद पैगंबरांच्या संदेशाचे कार्य
बेळगाव : एका मानवाला वाचविणे म्हणजे सर्व मानव जातीला वाचविणे आहे आणि एका व्यक्तीची हत्या करणे म्हणजे संपूर्ण मानव जातीचीच हत्या करणे होय. त्यामुळे चांगली व्यक्ती (भला इन्सान) होणे हेच मानवाचे मुख्य कर्तव्य असायला हवे, असा संदेश मोहम्मद पैगंबर यांनी दिला आणि आपले उपनिषदही तेच सांगते, असे विचार जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष शाहिद मेमन यांनी मांडले. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सदर संस्थेतर्फे पैगंबरांचा संदेश देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी ठिकठिकाणी जात आहेत. गुरुवारी ‘तरुण भारत’मध्ये त्यांनी हे विचार व्यक्त केले. त्यांच्यासमवेत मेहबूब खान, रियाज आवटी, मोहसीन ढालायत, मोहम्मद जहांगीर व अनिस मुजावर होते.
शाहिद म्हणाले, कोणाचेही मन दु:खी करणे ही चुकीची गोष्ट आहे, असे पैगंबर सांगत. न्याय हा दयेचाच घटक आहे. पैगंबरांच्या मानवतेच्या संदेशाकडे आकृष्ट झालेल्या जनसमूहाने त्यांना खुदा मानले. आपण स्वत: बदलण्याची धडपड सुरू करायला हवी, मग तुम्हाला ईश्वर असो किंवा अल्लाह नक्की मदत करेल, असेही ते सांगत. समाजाच्या एकीसाठी पैगंबर झटले. ते समाजाला जोडणारे होते. आपली कर्तव्ये पार पाडा, असाच संदेश ते नेहमी देत. आई-वडिलांना मान द्या आणि दीन-दुबळ्यांना मदत करा, हा त्यांचा संदेश होता. सर्वजण समान आहेत, हा संदेश नमाजमधून दिला जातो. तेथे श्रीमंत-गरीब, लहान-मोठा असा कोणीही नसतो. त्यांनी अल्लाहचे दूत होऊन मानवतेची सेवा केली. सत्य-असत्य ओळखण्याची क्षमता आपण वाढविली पाहिजे. श्रीकृष्णाने गीतेमधून अर्जुनाला संदेश दिला, तो आम्ही समजून घ्यायला हवा आणि मोहम्मद पैगंबर यांनी पवित्र कुराणामधून संदेश दिला तो तुम्ही समजून घ्यायला हवा, असे त्यांनी सांगितले. ‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री यांनी सर्व धर्मांमध्ये समभाव सांगितला आहे. तो अंमलात आणणे आवश्यक आहे, असे सांगून आभार मानले.









