महिन्याभरात दहा चोऱ्या : लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांकडून अद्याप एकाही चोरीचा नाही तपास, नागरिकांतून तीव्र संताप
खानापूर : खानापूर येथील रुमेवाडी नाका परिसरात असलेल्या राजू घाडी यांच्या किराणा दुकानात चोरट्यांनी मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास शटर तोडून गल्ल्यातील 40 हजार रोख लांबविले आहेत. चोरट्यानी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडून नंतर दुकानात प्रवेश केला. त्यामुळे चोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही. चोरट्यानी इतर कोणत्याही वस्तूला हात लावले नाही. मात्र गल्ल्यातील चिल्लर पैसे लांबविले आहेत. गेल्या महिन्याभरात शहर परिसरात चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून रुमेवाडी नाका येथे पंधरा दिवसात चार चोऱ्या झाल्या असून गेल्या काही दिवसात दहा ठिकाणी चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र एकाही चोरीचा तपास पोलिसांकडून लावण्यात यश आले नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षापूर्वी खानापूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. यावेळी पोलिसांनी तालुक्यात अनेक जागृती बैठका घेऊन नागरिकांना सजग केले होते. त्यामुळे काही प्रमाणात या चोऱ्यांवर आळा बसला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात सर्वत्र दिवसाढवळ्या बंद घरे लक्ष करून चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. चोरी करण्याचा एकच प्रकार असून बंद घराच्या मागील दार तोडून प्रवेश करून चोरी करण्यात येत आहे. हे सर्व प्रकार दिवसाढवळ्याच घडत आहेत. तर काही ठिकाणी रात्रीही धाडसी चोऱ्या करण्यात येत आहेत. रुमेवाडी नाका येथे पंधरा दिवसांपूर्वी कदम आणि भेकणे यांच्या घरी रात्री चोरी करण्यात आली होती. पुन्हा मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी गल्ल्यातील चाळीस हजार रोख लांबविले. त्यामुळे या परिसरात भीती निर्माण झाली आहे. पोलिसांकडून चोरी झाल्यानंतर फिर्याद घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. किराणा दुकानदार राजू घाडी यांच्या दुकानातील चोरी झाल्यानंतर सदरची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र या ठिकाणी निरीक्षक अथवा उपनिरीक्षकांनी भेट दिली नाही. बिट हवालदाराकडून फक्त पाहणी करण्यात आली असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात चोरींच्या सत्रात पुन्हा वाढ झाली आहे. जवळपास दहा ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. तसेच वर्षभरापासून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. अद्याप खानापूर पोलिसांकडून एकाही चोरीचा छडा लावण्यात यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांतून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षिततेची हमी कोण घेणार
रुमेवाडी नाका येथे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे निवासस्थान असून या ठिकाणी गेल्या वीस दिवसात पाच चोरीचे प्रकार घडले आहेत. आमदार निवास परिसरातच जर सलग चोऱ्या होत असतील तर तालुक्यातील सुरक्षिततेची हमी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.









