समस्या तातडीने दूर करण्याची मागणी
बेळगाव : आरपीडी क्रॉस येथील मुख्य रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत असून या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. दि. 25 जून रोजी याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांनी मनपा व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर हे काम पूर्ण झाले होते. या ठिकाणी मोठी पाईप घालण्यात आली होती. परंतु परत त्या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी साचले असून त्याचा निचरा होत नाही. सध्या तिसऱ्या रेल्वेगेटपासून आरपीडीपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. जर हे काम पूर्ण झाले तर पुन्हा ड्रेनेज पाईपलाईनचे काम हाती घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ड्रेनेजच्या पाण्याची समस्या दूर करणे आवश्यक आहे. अवर्सेकर यांनी पुन्हा ही बाब प्रशासनाच्या नजरेस आणून दिली आहे. मात्र यावर त्वरित कार्यवाही होणेही आवश्यक आहे.









