इस्रायलमधून आज विशेष विमान येणार : ‘हमास’शी संघर्ष सुरूच : सीरियावरही हल्ला : दोन विमानतळांना केले लक्ष्य
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धमय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशाला संबोधित करताना हमासशी संबंधित प्रत्येकाला अद्दल घडविण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही बाजूंच्या हल्ल्यात किमान साडेचार हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले असून त्याअंतर्गत 18 हजार भारतीयांना भारतात परत आणले जाणार आहे. भारतीय नागरिकांची पहिली तुकडी गुरुवारी रात्री इस्रायलच्या तेल अवीव येथून भारतासाठी रवाना होणार असून शुक्रवारी सकाळी मायदेशी दाखल होणार आहे.
हमासच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. आतापर्यंत इस्रायल-हमास युद्धात भारतीय लोकांची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेत परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि माहिती आणि मदत देण्यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय तेल अवीवमधील भारतीय दुतावास आणि रामल्ला येथील भारतीय कार्यालयाने आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. नवी दिल्लीत विशेष कक्ष उभारून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायली पंतप्रधानांशी संपर्क साधत भारतीयांच्या सुरक्षेसह विविध मुद्यांवर चर्चा केली आहे. यापूर्वी भारताने रशिया-युव्रेन संघर्षादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम यशस्वीपणे राबविली होती.
इस्रायलमध्ये ‘आपत्कालीन’ सरकार स्थापन
इस्रायलने विरोधकांसोबत आणीबाणीचे सरकार स्थापन केले आहे. इस्रायलच्या सीमावर्ती समुदायांवर हमासच्या आकस्मिक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सरकार आणि युद्ध मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे. सर्व पक्षांना एकत्र काम करता यावे यासाठी इस्रायलचे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने या आपत्कालीन परिस्थितीत ‘आपत्कालीन सरकार’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आमचे संपूर्ण लक्ष युद्धावर आहे, जोपर्यंत आम्ही हमासशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला मारत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे नेत्यानाहू यांनी स्पष्ट केले आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या काळात हमासनेही घुसखोरी केली होती आणि सामान्य लोकांना लक्ष्य केले होते. यानंतर इस्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुऊवात केली. एकीकडे इस्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले होत असताना दुसरीकडे हमासही इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागत आहे. तसेच इस्रायल सीरियासह अन्य देशविरोधी शक्तींशीही समर्थपणे सामना करत आहे. सीरियातील दोन विमानतळांवर गुरुवारी इस्रायलने हल्ला करत आपली क्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायलला भेट देणार
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यानंतर आता संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन शुक्रवार, 13 ऑक्टोबरला इस्रायलला भेट देणार आहेत. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 25 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे.
केरळने जारी केला हेल्पलाईन क्रमांक
इस्रायलमधून देशात परतणाऱ्यांना मदत करण्यासाठी दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा क्रमांक 011-23747079 असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. इस्रायलमधून भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान गुरुवारी रात्री तेल अवीव येथून निघेल आणि शुक्रवारी सकाळी भारतात पोहोचेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायलला लागून असलेल्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांशी संपर्क साधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना परतीची मागणी नोंदवण्यास सांगितले आहे.









