वृत्तसंस्था /डेहराडून
उत्तराखंड राज्यातील पिठोरागड येथे असलेल्या ‘पार्वती कुंड’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजाआर्चा आणि प्रार्थना केली आहे. नंतर त्यांनी तेथून ‘कैलास’ पर्वताचे दर्शन घेतले. कैलासदर्शन करणारे ते भारताचे प्रथम नेते ठरले आहेत. ते सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी या देवस्थानाला भेट देऊन तेथे काही काळ व्यतीत केला. त्यांनी शंखनादही केला आणि महामृदंगाचे वादनही काही काळ केले. पार्वती कुंडाच्या परिसरात असणाऱ्या शिवपार्वती मंदिरालाही त्यांनी भेट दिली. तेथे ते आरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सकाळी हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पिठोरागड येथे 4 हजार 200 कोटी रुपये खर्चाच्या अनेक प्रकल्पांची कोनशीला स्थापन केली. त्यांनी सीमावर्ती प्रदेशातील गुंजी या खेड्याला भेट देऊन तेथील ग्रामस्थांसह काही काळ व्यतीत केला. त्यांनी ग्रामस्थ आणि तेथील सुरक्षा सैनिकांसह चर्चा व हास्यविनोद केले. प्रकल्पांची कोनशीला बसविल्यानंतर त्यांनी जाहीर सभेत भाषण केले. पिठोरागड येथे पायाभूत सुविधांची निर्मिती करुन येथे पर्यटनाला अधिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. त्याबरोबरच कृषी आणि उद्योग यांनाही प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मागितले देशासाठी आशीर्वाद
पार्वती कुंड येथील मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी आशीर्वादाची कामना केली. त्यांनी कैलासपर्वताच्या पायथ्याशी काही काळ ध्यानधारणा केली. कैलास पर्वत हे भगवान शंकराचे वास्तव्यस्थान मानले गेले आहे. पंतप्रधान मोदी यांची ही या स्थळाला प्रथमच भेट होती.









