वृत्तसंस्था /नवी दिल्ली
या आठवड्यात भारतात होणाऱ्या जी-20 परिषदेला कॅनडा अनुपस्थित राहणार आहे. तसे त्या देशाने कळविले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाल्याने भारत आणि कॅनडा संबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कॅनडाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली. जी-20 देशांच्या संसदीय अध्यक्षांची ही परिषद आहे. ती आज शुक्रवारी दिल्लीत होणार आहे. कॅनडाच्या लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष रेमाँड गॅग्ने हे या परिषदेला उपस्थित राहतील, असे आधी घोषित करण्यात आले होते. तथापि, आता त्या देशाने त्यांना न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
अद्यापही चर्चा सुरुच
भारत आणि कॅनडा यांच्यात मतभेद निर्माण झाले असले तरी अद्यापही चर्चेचे मार्ग पूर्णत: बंद झालेले नाहीत. दोन्ही देशांचे मुत्सद्दी एकमेकांच्या संपर्कात असतात. मात्र, चर्चा गुप्त रहात असेल तरच तिचे मह।व टिकून राहते. भारताने कॅनडाला त्याचे भारतातील राजनैतिक प्रतिनिधी कमी करण्याची सूचना केली आहे. त्यांसंबंधी अद्यापही चर्चा सुरु आहे. ती पुढेही सुरु राहू शकते, अशी माहिती कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मेलानी जोली यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी पाठविणार का ?
कॅनडाच्या लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष उपस्थित राहणार नसले तरी कॅनडा त्यांच्याऐवजी अन्य प्रतिनिधी पाठविणार आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संबंधात गॅग्ने यांच्या कार्यालयानेही कोणती माहिती दिलेली नाही. कॅनडाला या परिषदेचे रितसर आमंत्रण भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले होते. प्रारंभी गॅग्ने यांनी येण्याची तयारीही दर्शविली होती.









