अफगाण अध्यक्षांचा भारताला सल्ला
नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे निर्वासित अध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी भारताला पाकिस्तान अन् तालिबानी राजवटीच्या संबंधांवरून मोठा सल्ला दिला आहे. भारताने पाकिस्तान अन् तालिबानमधील संबंधांना कमी लेखू नये असे सालेह यांनी म्हटले आहे. आयएसआय आणि तालिबान यांच्यातील संबंधांना तुम्ही कमी लेखू शकत नाहीत. भारतीय विश्लेषक पाकिस्तानची मदरसा प्रणाली आणि अफगाण-तालिबान यांच्यातील संबंधांकडे दुर्लक्ष करत आहेत. पाकिस्तानने तालिबान राजवटीला समर्थन देणे बंद केल्यास ती कोसळेल. काही लोक मुल्ला याकूबसारख्या तालिबानी नेत्यांवरून प्रभावित आहेत, परंतु जेव्हा आणखी एक दहशतवादी हल्ला होईल तेव्हा सर्वकाही बदलणार असल्याचा इशारावजा सल्ला सालेह यांनी भारताला दिला. अमेरिकेचे सैन्य बाहेर पडताच तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. यादरम्यान अध्यक्ष गनी यांनी देशाबाहेर पळ काढला आणि सालेह यांनी स्वत:ला देशाचा अंतरिम अध्यक्ष घोषित केले होते.









