वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती : दरवाढीशिवाय महसुलात भरीव वाढ
पणजी : वीज खात्यातर्फे गतवर्षी प्रारंभ करण्यात आलेल्या कामांसह एकुण 2640 कोटी ऊपयांची कामे यंदा हाती घेण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने साळगाव येथील 300 कोटी खर्चाच्या वीज उपकेंद्राचा समावेश आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. बुधवारी पणजीत वीज मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावळी मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडीस यांच्यासह कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता आदींची उपस्थित होती. पुढे बोलताना त्यांनी, वीज खात्याने कोणतीही दरवाढ न करता केवळ वसुलीतूनच आपल्या महसुलात 20 टक्के वाढ केल्याचे सांगितले. त्यात मार्च 2024 पर्यंत आणखी 400 कोटी ऊपयांची भर पडेल असा विश्वास व्यक्त केला.
नवरात्रौत्सवापासून 1600 कोटींच्या कामांचा शुभारंभ
पावसाळा जवळजवळ संपुष्टात आला असून वीज खाते आता मोठ्या प्रमाणात कामे हाती घेणार आहे. गतवर्षी हाती घेण्यात आलेल्या 2640 कोटींच्या कामापैकी 900 कोटींची कामे प्रारंभही करण्यात आली आहेत. उर्वरित कामे आता हाती घेण्यात येणार आहेत. येत्या दि. 15 पासून नवरात्रौत्सवाचा मुहूर्त साधून सुमारे 1600 कोटींची कामे सुरू करून या आर्थिक वर्षातच ती पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत.
विविध मतदारसंघांत विविध कामे
ही कामे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात असून त्यापैकी पुर्णत्वास आलेल्या कामांची उद्घाटनेही करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को, बाणावली, लोटली, फातोर्डा आदी मतदारसंघांसाठी वेर्णा येथे स्थापन केलेल्या 63 एमबीए ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे. दि. 21 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. दि. 15 रोजी मये, सांखळी, चोडण आणि कारापूर येथे सुमारे 30 कोटींच्या कामांना प्रारंभ करण्यात येणार आहेत. दि. 16 रोजी पणजी, सांताक्रूज, ताळगाव आणि सांतआंद्रेत सुमारे 70 कोटींची कामे सुरू होणार आहेत. वास्कोत 30 कोटींचे काम हाती घेण्यात येणार आहे. दि. 22 रोजी बाणावली, वेळ्ळी, मडगाव, केपे, पंचवाडी, कुडचडे या मतदारसंघासाठी 200 कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे प्रारंभ होणार आहेत. दि. 23 रोजी मांद्रे सबस्टेशन चे उद्घाटन होणार आहे.
दि. 2 नोव्हेंबरपासून पुन्हा कामे प्रारंभ होणार असून त्यात हळदोणे, म्हापसा, पर्वरी, फोंडा, काणकोण, केपे, सावर्डे, वाळपई, पर्ये, डिचोली, या मतदारसंघांचा समावेश असेल. संपूर्ण बार्देशसह पेडणेपर्यंतच्या भागातील विजेची समस्या कायमस्वऊपी सोडविण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण ठरणार असलेल्या साळगाव येथील सुमारे 300 कोटी खर्चाच्या सबस्टेशनचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध भागात मिळून सुमारे 200 ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. त्यावर सुमारे 70 कोटी खर्च करण्यात येणार आहे. हा खर्च केंद्राच्या योजनेतून प्राप्त झालेला आहे, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली.
तामनार प्रकल्प सुरू
तामनार पॉवर लाईन प्रकल्पाबाबत विचारणा केली असता ढवळीकर यांनी, सदर प्रकल्प सुरू असला तरी तो कधी पूर्ण होईल त्याबद्दल सांगू शकत नसल्याचे सांगितले. मात्र जेव्हा तो पूर्णत्वास येईल तेव्हा गोव्यासह अन्य राज्यांनाही त्याचा फायदा होईल, असे सांगितले. अन्य एका प्रस्नावर बोलताना ढवळीकर यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने रिलायन्स साळगावकर पॉवर कंपनीला लवादाचा खर्च म्हणून 510 कोटी ऊपये दिले असल्याचे सांगितले.









