सामन्यांचे तिकीटच मिळेना! : बुक माय शोवर क्रिकेट प्रेमींची ससेहोलपट, नाराजी
आष्टा/ सुनील पाटील
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होत असतानाही भारतीय संघाच्या सामन्यांची तिकिटे भारतीय दर्शकांना सहज मिळणे मुश्किल झाले आहे. बुक माय शोवर तिकीटे तीन, चार तासांच्या प्रतिक्षेनंतर ही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यासह भारतीय संघाच्या बहुतांश सामन्यांना रसिक वंचित राहणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातच बोगस वेबसाईटचा सुळसुळाट झाला असून तिकीट देण्याचा निमित्ताने लोकांना हजारो रुपयांचा गंडा घातला जात आहे.
भारत सोडून उर्वरित देशांच्या क्रिकेट सामन्यांची तिकिटे येथे सहजपणे उपलब्ध होत आहेत. मात्र भारतीय संघाच्या सामन्यांची तिकिटे मिळविताना क्रिकेट प्रेमींची ससेहोलपट होत आहे. चार तासांच्या प्रतिक्षेनंतर ‘सोल्ड आऊट’चा संदेश आणि संयम राखल्याबद्दल धन्यवादाव्यतिरिक्त काहीही माहिती मिळत नसल्याची सर्वत्र तक्रार आहे.
बुक माय शोवर भारतीय सामन्यांची तिकिटे विक्रीसाठी खुली झाल्यानंतर 90 मिनिटांचा वेटिंग पिरीयड दिला जातो. एवढे करूनही क्रिकेट सामन्याचे तिकीट मिळत नाही अशी ठिकठिकाणच्या क्रिकेटप्रेमींची तक्रार आहे.अपवादानेच एखाद्याला तिकीट उपलब्ध होते. अल्प दरातील मोजक्याच स्टॅन्डची तिकिटे मैदानावर उपलब्ध केली जात आहेत. मात्र ती विक्रीसाठी कधी उपलब्ध होणार याबाबतचा खुलासा बीसीसीआय कडून लवकर होत नाही. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे येथील मैदानावर सामने होत असल्याने इतर जिल्ह्यातील प्रेमींना मैदानावर तिकिटासाठी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आता भारतीय संघाच्याऐवजी इतर संघांच्या सामन्यांची तिकिटे खरेदी केली जात आहेत. ही तिकिटे मिळवतानाही हाल होत असल्याची तक्रार आहे. मैदाने रिकामी दिसतात मात्र तिकीट मिळत नाही. यामुळे संताप वाढत असून बीसीसीआयने तिकीट विक्रीची प्रक्रिया सुलभ करून लोकांची लूट आणि फसवणूक थांबवावी अशी मागणी होत आहे. आपल्याला तिकीट मिळावे म्हणून अनेक रसिकांनी क्रिकेट संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय नेत्यांना साकडे घातले मात्र त्यांनाही तिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. इतरवेळी लोकांना सहज तिकीट मिळवून देणारे काही नेतेही आता लोकांना उत्तर देता देता हैराण झाले आहेत.
नऊ मैदानावर भारताचे सामने पण भारतीयांसाठी मृगजळ
भारतीय संघाचे सामने मुंबई,पुणे, अहमदाबाद, चेन्नई, कोलकता, दिल्ली, बेंगलोर,लखनौ, धर्मशाळा येथील मैदानावर होणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघाने क्रिकेट प्रेमींची मने जिंकली आहेत. भारतात विश्वचषक स्पर्धा होत असल्याने लाखो क्रिकेट प्रेमी मैदानावर जाऊन क्रिकेट सामना बघण्याची आणि आपल्या संघाला सपोर्ट करण्याची इच्छा बाळगून आहेत. मात्र तिकीटाबाबत आडमुठ्या धोरणामुळे सध्या भारतातील क्रिकेट प्रेमींना विश्वचषक सामने मैदानावर जाऊन पाहणे मृगजळ ठरत आहे.
फेसबुक, इन्स्टाग्रामवर आर्थिक फसवणूक
भारतीय संघाच्या सामन्यांची मागणी पाहून काही जणांनी फेसबुक, इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोगस अकाउंट काढून भारतीय सामन्यांची तिकिटे उपलब्ध असल्याचे भासवले आहे. त्यातून क्रिकेट प्रेमी सोशल मीडियावरील बोगस तिकीट विक्रेत्यांना बळी पडत आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. ऑनलाईन पैसे भरल्यानंतर ई तिकीट देण्याची हमी आणि चार ते पाच दिवसात कुरिअरने तिकीट उपलब्ध होईल असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात त्यात फसवणूक होते. पैसे बुडतात, आर्थिक गंडा घातला जातो.
तिकीट मिळत नसल्याची खंत
भारतात विश्वचषक सामना होत असल्याने क्रिकेट रसिक आनंदी होता. मात्र तिकीट न मिळाल्याने आनंदावर विरजण पडले आहे. क्रीडा प्रेमींची आर्थिक फसवणूक होणार नाही तसेच त्यांना मनस्तापही सहन करावा लागणार नाही अशा रितीने बीसीसीआयने ही तिकिटे सहजरित्या उपलब्ध करायला हवे होते. पंधरा दिवस भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र यश आले नाही. इतरही तिकीटे न मिळाल्याने निराशा झाली.
-डॉ. अमितकुमार सुर्यवंशी, इस्लामपूर
क्रिकेटप्रेमी