मुख्य टपाल कार्यालयात आधार लिंक करण्यासाठी गर्दी
बेळगाव : गृहलक्ष्मी तसेच शाळांमधील शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्याला लिंक करण्यासाठी कॅम्प येथील टपाल कार्यालयात बुधवारी गर्दी झाली होती. तसेच सकाळी 8 वाजल्यापासून महिला तसेच विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या होत्या. बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसल्यास योजनांचा लाभ मिळणार नसल्याने नागरिकांची धडपड सुरू आहे. नागरिकांनी राष्ट्रीयीकृत बँकांसह इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते सुरू केले आहे. सर्व सरकारी योजना वा शिष्यवृत्त्या या खात्यांमध्ये जमा होतात. परंतु, बऱ्याच नागरिकांनी काही वर्षांपूर्वी आधारकार्डऐवजी इतर कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते सुरू केले होते. परंतु, सध्या कोणत्याही योजनेसाठी बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे.
सध्या सरकारी शाळांना दसरोत्सवाची सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मुख्य पोस्ट कार्यालयात गर्दी केली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही आधार क्रमांक लिंक करण्यासाठी दाखल झाले होते. पोस्ट कार्यालयाने जुन्या कॅन्टीन परिसरात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. गर्दी टाळण्यासाठी सध्या दोन काऊंटर असले तरी नागरिकांना उन्हामध्ये थांबून आधारकार्ड लिंक करावे लागत आहे. विद्यार्थ्यांना विविध योजनांमधून शिष्यवृत्ती मिळत असते. आर्थिकदृष्ट्या, जातनिहाय तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी बँक खात्याला आधारकार्ड जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडले आहे, त्यांना ते लिंक करावे लागत आहे. याबरोबरच खात्यातील रक्कम काढण्यासाठीही महिलावर्गाची मोठी गर्दी झाली होती.









