शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करा : नेगीलयोगी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पिके घेण्यासाठी सात तास वीजपुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे. कर्ज वसुली त्वरित थांबवावी, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नेगीलयोगी रयत संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यंदा संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके उगवून आली आहेत. मात्र पावसाअभावी सदर पिके करपू लागली आहेत. काही भागात पेरणी केलेल्या पिकांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने त्वरित आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आर्थिक संस्थांकडून कर्ज वसुलीला स्थगिती द्या
नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रतिएकर 25 हजार रुपये भरपाई जाहीर करावी. जनावरांना चारा, पाणी याची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांनी बँक, सहकारी संस्था, कृषी विकास बँक, खासगी फायनान्स आदी ठिकाणी कर्ज घेऊन शेतीमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. यामुळे आर्थिक संस्थांकडून कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात यावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, वन खात्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हटविण्यात येवू नये, बगरहुकूम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हक्कपत्र द्यावी, वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी व सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख भरपाई द्यावी, अशी मागणीही केली आहे. यावेळी आण्णाप्पा पाटील, रवी पाटील, निलव्वा शिंत्री, कल्लाप्पा हरियाळ, शिवाप्पा कुरी, कल्लाप्पा रपाटी आदी उपस्थित होते.
शेतकरी पोलिसांत बाचाबाची
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन येणाऱ्यांना बाहेरच आंदोलनाची व्यवस्था केली आहे. आवारात आंदोलनास मज्जाव आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी नियोजितस्थळी आंदोलन करण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात प्रवेश करून आंदोलनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. शेतकऱ्यांना बाहेर अडविताना पोलिसांचीही धावपळ उडाली. अखेर आवारामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले.









