वार्ताहर /सांबरा
येथील श्री महालक्ष्मी यात्रा मे 2024 मध्ये करण्याचा संकल्प मंगळवारी ग्रामस्थांनी केला. 18 वर्षानंतर सदर यात्रा होणार असून मंगळवार दि. 10 रोजी देवीसमोर गाऱ्हाणे घालून ग्रामस्थांनी यात्रा मे 2024 मध्ये करण्याचा संकल्प केला. त्यानंतर धार्मिक विधी व गाऱ्हाणे घातल्यानंतर रेडा व पालवा सोडण्यात आला. या कार्यक्रमासाठी लक्ष्मी गल्लीतील लक्ष्मी मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. मंदिरात सकाळपासूनच ग्रामस्थ जमू लागले होते. मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: फुलून गेला होता. या कार्यक्रमानिमित्त गावामध्ये कडक वार पाळण्यात आला होता. सर्व व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे बाजारपेठ व मेन रोडवर शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर रथ बनविण्यासाठी लागणारे औदुंबरचे लाकूड आणण्यासाठी ग्रामस्थ निघाले. प्रथम औदुंबरच्या झाडाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर औदुंबरचे लाकूड मिरवणुकीने आणून दुर्गादेवी मंदिरासमोर ठेवण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. साधारण दसरा झाल्यानंतर रथ बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. 70 फुटाचा रथ या यात्रेचे आकर्षण ठरणार आहे. येत्या मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात यात्रा होणार आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत.









