बेळगाव : उगार येथे उगार स्पोर्ट्स क्लब आयोजित उगार चषक निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज बेळगाव संघाने उगार स्पोर्ट्स क्लब संघाचा सात धावांनी पराभव करून निमंत्रितांचा उगार चषक व 50 हजाराचे रोख बक्षीस पटकावले. संतोष सुळगे पाटील याला मालिकावीराने तर अंतिम सामन्यातील सामनावीर अभिजित देसाई यांना चषक देऊन गौरविण्यात आले. उगार येथे निमंत्रितांच्या आंतरराज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने सांगली स्पोर्ट्स अकादमीचा आठ धावांनी पराभव केला. या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 2 गडी बाद 89 धावा केल्या. त्यात संतोष सुळगे पाटीलने 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा करीत अर्धशतक झळकवले. त्याला रब्बानी दफेदारने 2 षटकार आणि 2 चौकारासह 25 धावा करून सुरेख साथ दिली. सांगलीच्या किरण व अमित यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सांगली संघाने 6 षटकात 5 गडी बाद 80 धावाच केल्या. त्यात अजितने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25 धावांचे योगदान दिले.
बेळगावतर्फे किरण तारळेकरने 12 धावात 2 तर संतोष सुळगे पाटीलने एक गडी बाद केला. अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 4 गडी बाद 85 धावा केल्या. त्यात संतोष सुळगे पाटीलने 4 षटकार आणि 2 चौकारांसह 51 धावा करत सलग दुसरे अर्धशतक झळकवले. त्याला अभिजित देसाईने 4 षटकार आणि 2 चौकारांसह 12 चेंडूत 35 धावा करून सुरेख साथ दिली. उगारतर्फे सुमितने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना उगार संघाने 6 षटकात 3 गडी बाद 78 धावा केल्या. त्यात नरेंद्र मांगोरेने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 32 तर सागळ कांबळेने 22 धावांचे योगदान दिले. बेळगावतर्फे संतोष सुळगे पाटीलने 11 धावात 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या के. आर. शेट्टी संघाला आकर्षक चषक, रोख 50 हजार रुपये व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या उगार संघाला 25 हजार रुपये रोख, चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज नरेंद्र मांगोरे उगार, उत्कृष्ट गोलंदाज संतोष-उगार, मालिकावीर संतोष सुळगे पाटील-के. आर. शेट्टी, अंतिम सामन्यातील सामनावीर अभिषेक देसाई-बेळगाव यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी के. आर. शेट्टी किंग्जचे संचालक प्रणय शेट्टी, अन्वर द्राक्षी आदी उपस्थित होते.









