रोहित शर्माने या सामन्यात धमाकेदार खेळी करताना वनडे विश्वचषकात आपल्या 1000 धावाही पूर्ण केल्या. यादरम्यान, रोहितच्या नावावर विश्वचषकातील एक मोठा विक्रम नोंदवला गेला. रोहित आता सर्वात कमी डावांमध्ये 1000 वनडे धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम याआधी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरच्या नावावर होता. बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 30 चेंडूत अफगाणिस्तानविरुद्ध त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. याच धमाकेदार खेळीच्या जोरावर त्याने आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आणि डेविड वॉर्नरची बरोबरी देखील केली. वॉर्नर आणि रोहित आता संयुक्तरित्या सर्वात कमी डावांमध्ये 1000 धावा करणारे फलंदाज आहेत. तसेच रोहित शर्मा विश्वचषकात भारतासाठी एक हजार धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व विराट कोहली यांनी एक हजार धावा केल्या आहेत.
वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे फलंदाज
- 19 डाव – डेविड वॉर्नर
- 19 डाव – रोहित शर्मा
- 20 डाव – सचिन तेंडुलकर
- 20 डाव – एबी डिविलियर्स
हिटमॅन ठरला षटकारांचा बादशाह , गेलचा विक्रम मोडला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध लढतीत तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. रोहितच्या नावावर सध्या 555 षटकारांची नोंद झाली आहे. रोहितने 473 आंतरराष्ट्रीय डावात 555 षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे, हिटमॅनने विंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
- रोहित शर्मा – 453 सामन्यात 556 षटकार
- ख्रिस गेल – 483 सामन्यात 553 षटकार
- शाहिद आफ्रिदी – 524 सामन्यात 476 षटकार
- ब्रेडॉन मेकॉलम – 432 सामन्यात 398 षटकार
- मार्टिन गुप्टील – 367 सामन्यात 383 षटकार









