वृत्तसंस्था/ लखनौ
भारताविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात झालेल्या पराभवातून धडे शिकलेला ऑस्ट्रेलियन संघ आज गुरूवारी येथे विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात उत्साही दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. यावेळी अधिक चांगली फलंदाजी करण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या समोर राहणार आहे. पाच वेळच्या या विजेत्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात वाईट पद्धतीने झाली असून त्यात त्यांना यजमान भारताकडून सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, सलामीच्या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केल्याने दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावला आहे.
ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीने भारताविरुद्धचा सामना गमावला तो संघ व्यवस्थापनासाठी नक्कीच डोकेदुखीचा विषय राहणार आहे. त्यांच्या फलंदाजीत आक्रमकतेचा अभाव होता. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या व्यतिरिक्त कोणीही 30 धावांचा टप्पा ओलांडला नाही. त्यांनी पुन्हा एकदा पटापट फलंदाज गमावले. चेपॉकच्या फिरकीस पोषक खेळपट्टीवर अॅडम झाम्पा वगळता दुसरा आघाडीचा फिरकी गोलंदाज नसल्यामुळे त्यांच्या समस्या आणखी वाढल्या. सध्या मार्कस स्टॉइनिस दुखापतीतून बरा झाला असून कॅमेरॉन ग्रीनची जागा घेण्यास तयार झाला आहे. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळलेला हा अष्टपैलू खेळाडू एक सिद्ध ‘मॅचविनर’ आहे आणि मैदानाशीही परिचित आहे.
त्याशिवाय स्टॉइनिस ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या वेगवान त्रिकुटास मदत करेल. ग्लेन मॅक्सवेल झाम्पासोबत फिरकी माऱ्याची जबाबदारी उचलेल. परंतु दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने त्याच्यावर नक्कीच दबाव असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करताना त्यांच्या तीन फलंदाजांनी शतके नोंदविली. विध्वंसक क्विंटन डी कॉक हा स्टॉइनिससारखा असून तो ‘आयपीए’लमध्ये ‘एलएसजी’कडून खेळतो आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूप्रमाणेच मैदानाशी परिचित आहे.
याशिवाय रॅसी व्हॅन डर ड्युसेन व विश्वचषकातील सर्वांत जलद शतक झळकावणारा एडन मार्करम हे दोन विलक्षण आक्रमक फलंदाज आहेत. आयपीएलदरम्यान टीका झाल्यानंतर एकना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा तयार केली गेली असून ती फिरकीला मदत करू लागली, तर दक्षिण आफ्रिकेला फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीला आणण्याचा मोह होईल. डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजाच्या रूपाने त्यांच्याकडे आधीच एक समर्थ पर्याय आहे.
मात्र वेगवान गोलंदाजीच्या विभागात नॉर्त्झेच्या अनुपस्थितीत रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जॅनसेन यांच्यावर प्रचंड दबाव असेल. दक्षिण आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात मोठा विजय मिळालेल्या असल्याने आणि गेल्या महिन्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी ऑस्ट्रेलियावर 3-2 असा विजय मिळविलेला असल्याने मानसिकदृष्ट्या त्यांचे पारडे जड राहू शकते. परंतु ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या धैर्य आणि दृढनिश्चयासाठी ओळखला जातो आणि ते कधीही जोरदार पुनरागमन करू शकतात.
संघ : दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









