वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताच्या चार महिन्यांनंतर, भुवनेश्वर महानगरपालिकेने बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी 28 अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. या मृतदेहांवर कोणीही दावा केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 2 जून रोजी झालेल्या बालासोर रेल्वे दुर्घटनेत 297 जणांचा मृत्यू झाला होता.
रेल्वे अपघातानंतर अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया मंगळवारी संध्याकाळी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व 28 मतदेहांवर अंत्यसंस्काराचा क्रिया पूर्ण झाली. याप्रसंगी महिला स्वयंसेवकांनी अंत्यसंस्कारात सक्रिय सहभाग घेतल्याचे भुवनेश्वर महानगरपालिकेच्या महापौर सुलोचना दास यांनी सांगितले. ‘मुखाग्नी’ आणि अस्थीचे विसर्जन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) नेमण्यात आली आहे.
सर्व मृतदेह चार महिन्यांहून अधिक काळ जतन करून ठेवण्यात आले होते. त्यानंतर बीएमसीने भरतपूर स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी कोणत्याही निर्बंधांना न जुमानता महिला स्वयंसेविका अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आल्या होत्या. महिलांनीच चितेला अग्नी दिला. मृत व्यक्ती कोणत्या धर्माचे होते, ते पुऊष की महिला हेही त्यांना माहीत नव्हते, असेही महापौर सुलोचना दास यांनी सांगितले. अनोळखी मृतदेहांचा हा पवित्र विधी करण्यासाठी आम्ही स्वत: पुढे आलो, असे अंत्यसंस्कार विधीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.









