दिल्लीत दोन ठिकाणी छापासत्र, पुरकायस्थ यांचे निकटर्तीयही संशयाच्या भोवऱ्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘न्यूजक्लिक’ या न्यूज पोर्टलच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आता विदेशी निधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांची चौकशी करणार आहे. एजन्सीने बुधवारी राष्ट्रीय राजधानीतील कार्यालयासह दोन ठिकाणी छापेमारी करत झडती घेतली. सीबीआय न्यूजक्लिक विऊद्ध विदेशी निधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांची चौकशी करत असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘न्यूजक्लिक’च्या संस्थापकाला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली असून न्यायालयाने बचाव पक्षाचा कोणताही युक्तिवाद ग्राह्या धरला नसल्याचेही बुधवारी स्पष्ट झाले.
सीबीआयच्या पथकाने बुधवारी दिल्लीत न्यूजक्लिक आणि त्याचे संपादक प्रबीर पुरकायस्थ याच्या मालमत्तांचा परिसराचा शोध सुरू केला. यामध्ये न्यूजक्लिक आणि त्याच्याशी संबंधित पत्रकारांचा परिसर देखील समाविष्ट आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदींखाली दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात राष्ट्रीय राजधानीत अनेक ठिकाणी झडती घेतल्याच्या काही दिवसानंतर या प्रकरणात नवे वळण आले आहे.
विशेष सेलने 17 ऑगस्ट रोजी न्यूजक्लिकच्या विरोधात यूएपीए आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर अलिकडेच 3 ऑक्टोबर रोजी कार्यालयाच्या आवारात 46 लोकांची चौकशी करण्यात आली होती. स्पेशल सेलने नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात घेण्यात आलेल्या झडती, जप्ती आणि ताब्यात घेण्याबाबत दिलेल्या निवेदनात दिल्ली पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली होती. चिनी प्रचाराचा कथितपणे प्रचार केल्याबद्दल अमेरिकन लक्षाधीश नेव्हिल रॉय सिंघमशी जोडलेल्या नेटवर्कद्वारे वित्तपुरवठा केलेली संस्था असा आरोप न्यूजक्लिकवर करण्यात आला होता. यासंबंधी सखोल तपास केल्यानंतर स्पेशल सेलने न्यूजक्लिकचे संस्थापक पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली. सुरुवातीला त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.