नितीश कुमारांनी बिहारला तुकड्यांमध्ये विभागले
वृत्तसंस्था / नालंदा
माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते आरसीपी सिंह यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील जातीय जनगणनेच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जातीय जनगणनेची आकडेवारी अचूक नाही. नितीश कुमारांनी बिहारला तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागण्याचे काम केले आहे असा आरोप आरसीपी सिंह यांनी केला.
नितीश कुमार हे बिहारच्या अस्मितेबद्दल बोलायचे, त्याचे काय झाले? नितीश यांनीच जाती-जातींमध्ये फूट पाडली आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी बिहार दिन साजरा करत राज्यातील लोकांमध्ये बिहारीपणा जागविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नितीश यांनी आता केवळ स्वत:बद्दल विचार करा आणि स्वत:च्या जातीकडे पहा असा संदेश दिला असल्याची टीका सिंह यांनी केली.
190 हून अधिक जातींची लोकसंख्या 1 लाखापेक्षा कमी आहे. पंतप्रधान मोदी हे देशभक्तीबद्दल बोलतात, आमचा वैज्ञानिक जेव्हा चंद्रावर पोहोचतो, तेव्हा त्याला तू कुठल्या जातीचा आहेस असे विचारले जाते का? परंतु नितीश कुमार हे जातींची गणना करत असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली आहे.









