या ठिकाणी जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान : चीनच्या सीमेपासून 20 किमी अंतरावर
वृत्तसंस्था / पिथौरागड
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी एकदिवसीय उत्तराखंड दौऱ्यावर जाणार आहेत. पिथौरागडमध्ये चीन सीमेवर असलेला आदि कैलास पर्वत आणि पार्वती तालचे दर्शन घेत पंतप्रधान तेथे ध्यान करणार आहेत.
उत्तराखंडला लागून असलेल्या चीन सीमेवर आदि कैलास पर्वताचे दर्शन घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी हे पिथौरागडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करतील. पंतप्रधान ज्या ठिकाणाहुन कैलास पर्वताचे दर्शन करतील, त्याचे नाव जोलिंगकोंग आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची 15 हजार फूट इतकी आहे. येथून 20 किलोमीटर अंतरानंतर चीनची सीमा सुरू होते.
उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातील 18 हजार फुटांच्या उंचीच्या लिपुलेख पर्वतांवरून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसून येतो. येथून पर्वताचे हवाई अंतर 50 किलोमीटर इतके आहे.
12 ऑक्टोबर रोजी सकाळी पंतप्रधान सर्वप्रथम पिथौरागड जिल्ह्यातील जोलिंगकोंग येथील पार्वती कुंडाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर जोलिंगकोंगमध्ये सैन्य, बीआरओ आणि आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. मग पंतप्रधान हे आदि कैलास ह्यू पॉइंटवरून आदि कैलास शिखराचे दर्शन घेतील. तर दुपारी 12 वाजता जागेश्वर धाम मंदिरात पंतप्रधान मोदी पूजा करतील. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कुमाऊं क्षेत्रातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पेले आहे.









