केजरीवाल यांचा आरोप : आप नेत्यांविरोधात 170 गुन्हे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम आदमी पक्ष संपवू पाहत आहेत. आमचे आमदार आणि नेत्यांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदविले जात आहेत. आतापर्यंत आमच्या विरोधात 170 गुन्हे नोंद झाले, 140 प्रकरणांमध्ये निर्णय आमच्या बाजूने लागला. एका पैशाचाही घोटाळा आम्ही केला नसल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केला आहे.
आप नेत्यांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदवून खटले भरले जात आहेत. दोन वर्षांपासून आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सातत्याने अटक केली जात आहे. मनीष सिसोदिया यांच्याविरोधात ईडीकडे कुठलाच पुरावा नाही. तसेच संजय सिंह यांना अटक करण्यात आली असून अमानतुल्ला खान यांच्या घरी छापे टाकण्यात आले. आतापर्यंत एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप सिद्ध झालेला नाही. तर दुसरीकडे भ्रष्ट नेते भाजपमध्ये सामील होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे वातावरण बिघडवून टाकले आहे. मोदींच्या वागण्यात अहंकार असून सर्वजण त्यांना घाबरत आहेत. आम आदमी पक्षाला चिरडून टाकण्याचा पंतप्रधानांचा पूर्ण प्रयत्न आहे. 2015 मध्ये आमचे सरकार सत्तेवर येताच शुंगलू समिती स्थापन करण्यात आली, 400 फाइल्स तपासण्यात आल्या, परंतु कुठलीच अनियमितता आढळून आली नसल्याचे केजरीवाल म्हणाले.
आपचा ईडीवर आरोप
दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने अबकारी घोटाळ्याप्रकरणीत अटकेत असलेले आप खासदार संजय सिंह यांच्या कोठडीत 3 दिवसांची वाढ केली आहे. ईडीने त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाला कल्पना न देता संजय सिंह यांना ईडीने कुठेच नेऊ नये असे न्यायालयाने म्हटले होते. तपास यंत्रणेने संजय सिंह यांना दोनवेळा अज्ञात ठिकाणी नेल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. माझा एन्काउंटर झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न संजय सिंह यांनी उपस्थित केला होता.
संजय सिंह यांच्या कुटुंबाला त्रास
ईडी आता भाजपकडून लागू करण्यात आलेल्यया नियमांचे पालन करत आहे. ईडीचा बॉस कुठल्याही पुराव्यांशिवाय अटकेची कारवाई घडवून आणत आहे. संजय सिंह यांच्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या छळले जात आहे. कुटुंबीयांची भेट घेण्याची वेळ संध्याकाळी 6-7 दरम्यान असते, परंतु कुटुंबाला दीर्घ प्रतीक्षा करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आप आमदार दिलीप पांडे यांनी केला आहे.









