आकाशाचा रंग स्वत:चा कधीच नसतो. वारा तर अदृश्य तरंगणाऱ्या द्रव्यातून रंगत असतो. पाणीसुद्धा रंगहीन ज्या रंगात जाईल त्या रंगाचे होते. या सगळ्यांचा मिलाफ झाला की कोणता रंग कोणाचा कळत नाही. असा रंग, त्यासाठी अंतरंगात रुजावा लागतो आणि म्हणूनच त्याआधी मातीशी एकरूप व्हावं लागतं. माणसाला रंगाची ओढ जन्मता:च असते, हे आपण जाणतोच. प्रकाशाच्या दिशेला वळणारे नवजात बालक, पाळण्यावरच्या रंगीत चिमण्यांमध्ये रंगून जातं. नंतर खेळण्याचे रंग, कपड्यांचे रंग, पुस्तकांचे रंग, पुढे स्वभावाचे रंग आणि सृष्टीचे रंग उलगडण्यातच खऱ्या अर्थाने जीवन यात्रा सुरू होते. माणसाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्या माणसाच्या घरी जायला हवं. त्याच्या घराचे रंग त्यांनी घातलेल्या कपड्यांचे रंग, यावरून चटकन त्याच्या स्वभावाची कल्पना येते. घराच्या भिंती, पडदे, दारातली रांगोळी किंवा भिंतीवरच्या वेगवेगळ्या फ्रेम्स यातून त्या त्या घराच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे अंतरंगात उमटलेले रंग असतात. अशी तुमच्या रंगाची आवड इतरांच्या मनात तरंग निर्माण करत असते. फुलाचे रंग बघतांनासुद्धा तो डोळ्यांनी बघायला लागतो. पण आम्ही मात्र बघण्यापेक्षा हाताने ओरबाडणारे ठरतो. बघणारे डोळे अंतरंग शोधत असतात तर ओरबडणारे हात रंगाचा बेरंग करत असतात. त्यांच्या मनातली खदखद जास्त मोठी असते. त्यामुळे तरंग वगैरे उमटणं लांबच राहतं. नाटकाला रंगभूमी का म्हणतात हे या सृष्टीच्या आंतरिक नाट्यावरून समजते. प्रत्येक कलाकाराची भूमिका त्याच्या अभिनयाच्या आधी कपड्याच्या रंगावरून मनावर जास्त ठसते. रावण, शकुनी मामा काळ्या कपड्यांमुळे मनावर काळे, नकारात्मक तरंग उमटवतात. प्रेमळ जोडपे गुलाबी रंगात समोर येते, त्याच्या जोडीला त्यांना स्पष्ट करणारे त्या त्या रंगाचे प्रकाशझोतही (स्पॉट) असतात. हे जगसुद्धा अशीच रंगभूमी ठरते. नानाविध रंगांची उधळण व्यक्तिनुरुप होत असते. इथे त्रिगुणाचे रंग सतत नाट्या घडवत असतात व सृष्टीचा तोल सांभाळत असतात. रंगाशी जसं अंतरंग जोडलेलं असतं तसंच रंगाशी विकारसुद्धा जोडलेले असतात. आम्ही या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये राहत असल्यामुळे सत्व, रज, तम हे जे गुण आहेत हे आमच्यातल्या विकारांना जन्म देत असतात. सत्व म्हणजे पांढरा रंग. रज म्हणजे लाल रंग तर तम म्हणजे काळा रंग. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग क्रोधाचा तर काळा रंग निराशेचा.
क्रमश:








