जावयाला डुकराचे रक्त पाजविण्याची प्रथा
भारतात विवाह एखाद्या सणासारखा असतो. वधूपक्ष स्वत:च्या आयुष्यभराची कमाई खर्च करत स्वत:च्या मुलीचा विवाह करत असतो. तसेच जावयाला सासरी पूर्ण सन्मान दिला जातो. सासरी आलेल्या जावयाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जात नाही. जवळपास प्रत्येक ठिकाणी जावयाचा मोठा पाहुणचार करण्यात येतो. परंतु भारतात राहणारा एक समुदाय याच्या उलट वागत असतो.
भारत तसा मोठा देश असून येथे अनेक धर्माचे लोक राहतात. तसेच अनेक समुदायांचेही येथे वास्तव्य आहे. हे समुदाय आजही स्वत:चे नियम अन् प्रथांचे पालन करतात. या समुदायांना संरक्षण देण्यासाठी सरकार देखील अनेक प्रकारचे पुढाकार घेत असते. असे अनेक समुदाय आहेत, ज्याबद्दल बहुतांश लोकांना माहिती नसते. अशाच एका समुदायाचे नियम इतके विचित्र आहेत की ते ऐकल्यावर प्रथम विश्वासच बसणार नाही.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहणारा गोंड समुदाय भारताच्या इतिहासातील सर्वात प्राचीन समुदाय मानला जातो. हा समुदाय आजही स्वत:च्या प्रथापरंपरांचे कसोशीने पालन करतो. विशेषकरून विवाह विषयक नियमांचे.
या समुदायातील विवाहसोहळे अत्यंत वेगळे असतात. सर्व विवाहसोहळ्यांप्रमाणे यात देखील नाचगाणे होते. परंतु यातील काही नियम धक्कादायक आहेत. त्यातही मुलगा-मुलगी प्रेमविवाह करत असल्यास हे नियम अधिकच कठोर असतात.
देशात एकीकडे जावयाला खास वागणूक दिली जाते. तर दुसरीकडे या समुदायात जोडप्याला प्रेमविवाह करायचा असल्यास युवकाला प्रथम स्वत:च्या सासऱ्याच्या शेतात काम करावे लागते. हा युवक मेहनती असल्याचे संबंधित युवतीच्या वडिलांना वाटले तरच ते विवाहाची अनुमती देतात. याचबरोबर या युवकाला डुकराचे रक्त पिऊन युवतीसाठी काहीही करू शकतो असा विश्वास तिच्या वडिलांना द्यावा लागतो.









